आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना समरस करून कायदा शिकावा; सेवानिवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांचे व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी विज्ञानातून कायदा शिकावा, केवळ कायदा न शिकता त्याला विज्ञानाचे संदर्भ जोडले पाहिजे. विज्ञानातील संकल्पना कायद्याशी समरस करुन त्या शिकल्या पाहिजे, असे मत सेवानिवृत्त न्यायमूर्ती तथा गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.

शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापुजी साळुंके विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. विद्यार्थ्यांना कायदा सोपा जावा, यासाठी कायदा शिकताना विज्ञानाचा संकल्पना कशा वापरायच्या हे सांगितले. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करण्यासह तणावमुक्त आरोग्यासाठी काळजी घ्यावी. ते म्हणाले की, कायद्याची दुरुस्ती करायला हवी, हा राजकीय युक्तीवाद आहे. सध्याचे कायदे चांगले व लोकोपयोगी आहे. अभ्यास न करता कायद्यांवर टीका करणे योग्य नाही. लोकायुक्त कायदा व्यवस्थित बनवला नाही, अशी खंतही अंबादास जोशी यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी अभ्यास, व्यायाम, योग करणे गरजेचे आहे. आयुष्यातले काही क्षण शिकण्यासाठी घालवले पाहिजेत. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी वृत्तपत्र तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी वाचावे. कायद्याच्या मागील तरतुदी व हक्क शोधणे गरजेचे आहे. कायद्याची मूलतत्वे न्यायमूर्ती जोशी यांनी उदाहरण देऊन समजावून सांगितली. मराठी भाषा सर्व बाबींच्या अनुषंगाने समृद्ध व संपन्न आहे. जो देशाटन करून येतो तो संपूर्ण शिकतो. त्याला ज्ञानाचा खजिना मिळतो व शिकायला मिळते. वकील, न्यायाधीश व शिक्षकांना चांगले वक्तृत्व आले पाहिजे. न्यायाधीश व स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी लिहण्याचा सराव करणे गरजेचे आहे. तसेच मुलाखत देताना काय बोलावे व काय बोलू नये, याचा विचार करावा.

तसेच प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे द्यावीत, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मंत्र दिला. व्याख्यानास प्राचार्य डॉ. व्ही. जी. शिंदे, आयओएसी समन्वयक प्रा. नितीन कुंभार, आरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, वात्सल्य सामाजिक संस्था मंगरूळचे सचिव उमाकांत मिटकर, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण दानवे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य शिंदे, सूत्रसंचालक डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले तर आभार प्रा. श्रीयश मैंदरकर यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...