आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेचा लाभ:राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांच्या पाठपुराव्यास यश; जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांना न्याय

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ३० हजार ८२४ शेतकरी पीक प्रोत्साहन योजनेपासून वंचित राहणार असल्याची माहिती तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आणून दिल्यानंतर सर्व सभासदांचा विचार करत योजनेत सामावून घेतले जाईल असे आश्वासन दिले होते.

तत्कालीन सरकारच्या निर्णयानुसार महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील चालू बाकीदार शेतकऱ्यांसाठी ५० हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते. शासन परिपत्रकानुसार एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०२० सलग तीन वर्षाच्या कालावधीत चालू बाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार होता. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँके अंतर्गत २०१७ मध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्यात कर्ज वितरण झालेले असल्याने ५५ हजार ७५१ सभासदांपैकी ३० हजार ८२४ कर्जदार शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते. यामुळे जानेवारी २०१७ पासून कर्ज वितरण ग्राह्य धरण्यात यावे तसेच तीन वर्षा ऐवजी दोन वर्ष चालू बाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना ही या योजनेत पात्र करावे जेणेकरून एकही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी केली होती. मागणीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेट बैठकीत तीन ऐवजी दोन वर्ष चालू बाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने हा निर्णय स्थगित केला होता. पुन्हा त्यांनी हाच निर्णय जसाच्या तसा लागू केला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय शिंदे सरकारने लागू केल्यामुळे जिल्ह्यातील ३० हजार ८२४ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...