आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारची नीतीच चुकीची, लेकराबाळाचे कसे भागवायचे, कोरोनाला व गरिबीला कंटाळून आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून उस्मानाबाद तालुक्यातील सांजा गावातील केशकर्तनालयाचे मालक मनोज झेंडे यांनी रविवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली.
झेंडे यांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सलून व्यवसायावर उदरनिर्वाह चालत असे. मात्र, काही दिवसांपासून शासनाच्या कडक निर्बंधांमुळे सलून दुकाने बंद झाल्याने आणि गेल्या वर्षी एका मुलीचे लग्न केल्याने झेंडे कर्जबाजारी झाले होते. याच विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. झेंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
सुसाइड नोटमध्ये सर्व बाबींचा उल्लेख : झेंडे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे की, मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जिवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नयेत, ही माझी कळकळीची विनंती आहे. पोलिस अधिकाऱ्यांना उद्देशून त्यांनी ही चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये झेंडे यांनी कोरोना व गरिबीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. लेकराबाळांचे कसे भागवायचे याचीही चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
आर्थिक मदत द्या : सरकारने हातावर पोट असणाऱ्या सलून दुकानदाराला कोरोनाचे नियम अटी-शर्ती लावून काम करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा प्रत्येक नाभिक बांधवांना आर्थिक मदत करावी तसेच सांजा येथील आत्महत्याग्रस्त मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली आहे.
... सरकारची नीती चुकीची
विष प्राशन करण्यापूर्वी “सरकारची नीतीच चुकीची, लेकराबाळाचे कसे भागवायचे, कोरोनाला व गरिबीला कंटाळून आत्महत्या करत आहे,’ असे मृत्यूपूर्वी मनोज झेंडे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.