आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अणदूरच्या शेतकऱ्यांचे उन्हाळी सोयाबीन फायद्याचे; एका झाडास 80 ते 90 शेंगा, जे विकेल तेच पिकेल हे धोरण ठेवणे आवश्यक

अणदूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनवीन प्रयोगाचा आधार घेत शेती केल्यास तो नक्कीच फायदेशीर ठरतो हे तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रगतशील शेतकरी कल्याणी मुळे व उच्चशिक्षित नवतरुण शेतकरी नरेंद्र स्वामी यांनी उन्हाळी सोयाबीनचे पीक घेऊन आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. सोयाबीनचे हे उन्हाळी पीक शेतकऱ्यांना नक्कीच किफायतशीर ठरेल यात शंकाच नाही. येथील प्रगतशील शेतकरी कल्याणी मुळे हे सातत्याने शेतीत विविध प्रयोग अवलंबून नवनवीन उत्पादने घेत असतात. नवीन वाण नवीन प्रयोग अशी त्यांची ख्याती आहे. कल्याणी मुळे व त्यांचे सुपुत्र परमेश्वर मुळे यांनी १२ एकर शेतात केडीएस ७५३ फुले किमया हे सोयाबीनचे नवीन वाण टोकण केले त्यासाठी एकरी फक्त तेरा किलो बी लागले. निलंगा तालुक्यातील आलमला येथील सरपंच कैलास निलंगेकर यांच्याकडून हे बियाणे त्यांनी उपलब्ध करून जानेवारीच्या मध्यात दोन सरीतील अंतर २४ इंच तर टोकण बियातील अंतर ३ते ४ इंच असे मोकळ्या रानासह ऊसातही टोकण केले. एकरी एक पोते रासायनिक खत,तीन फवारण्या व स्प्रिंकलरने११ पाणी दिल्याचे मुळे यांनी सांगितले.ऊस मोठा झाल्यानंतर स्प्रिंकलरचे पाणी सोयाबीनला लागू होत नसल्याचे पाहून पाट पाणी दिले.एका झाडास ८० ते ९० शेंगा असून आज ११० दिवसानंतर सोयाबीन काढणी चालु आहे. वजन ८० ते ९० क्विंटल होईल असा अंदाज मुळे यांनी व्यक्त केला. उन्हाळी सोयाबीनची काढणी (रास) खरीपाप्रमाणे एकदाच करता येत नसून बहार येईल तसे दोन ते तीन वेळा काढावे लागते. पिकेल ते विकेल हे तंत्र सोडून विकेल तेच पिकेल हा नवा मंत्र शेतकऱ्यांनी शिकला पाहिजे असे मत मुळे यांनी व्यक्त केले.

असे आहे फायद्याचे गणित
येथील एमएससी शिक्षित नवतरुण नरेंद्र स्वामी यांनी प्रायोगिक तत्त्वावर हलक्या प्रतीचे असलेले एक एकर रान भिजवून १२ जानेवारीला केडीएस ७२६ फुले संगम या जातीचे २१ किलो सोयाबीन दोन फणी पेरणी केली. एकरी एक पोते रासायनिक खत,दोन फवारण्या,आंतर मशागतीसाठी तीन कोळपे व स्प्रिंकलरद्वारे दोन वेळा त्यानंतर पाटाचे मोकळे नऊ पाणी दिले.चार दिवसापूर्वी रास केल्यानंतर सोयाबीन वाळवून दहा पिशवी एकूण वजन ६५२ किलो भरल्याचे स्वामी यांनी सांगितले. एकूण खर्च वजा जाता आजच्या बाजार भावाने ४५ ते ५० हजारांचे उत्पन्न होईल.एकंदरीत खर्च वजा जाता दुपटीने फायदा होईल असा अंदाज स्वामी यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...