आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यावर तब्बल पाच दिवसांनी तुळजापूर नगरपालिकेला जाग आली. मंगळवारी (दि.३) शहरातील अनेक होर्डिंग्ज काढण्यात आली. दरम्यान, उशिरा का होईना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यावर येथील नगरपालिकेला पाच दिवसांनी जाग आली. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी होर्डिंग्ज विरोधात मोहीम राबवली.
दुपारपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, डाॅ. बाबासाहेबआंबेडकर चौक, गोलाई, जुने बसस्थानक आदी भागातील शेकडो होर्डिंग्ज काढण्यात आली. पालिकेने अनेक दिवसानंतर शहरात राबवलेल्या या मोहिमेमुळे तुळजापुरातील अनेक चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे शहर व चौकांच्या सौंदर्यात भर पडली आहे. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंके, सज्जन गायकवाड, राजू सातपुते यांच्यासह ठेक्यातील आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी होर्डिंग्ज विरोधी मोहीम राबवली.
२९ डिसेंबर रोजी झाली निवडणुकीची घोषणा
औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा २९ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत संबंधितांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्याकडे तुळजापूर नगरपालिकेचे मंगळवारपर्यंत दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.