आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मोर्चातून धडक:पेन्शन योजना, वेतनवाढ, शाळांना अनुदानासाठी शिक्षकांची वज्रमूठ

उस्मानाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजना, वेतनवाढ. शाळांना अनुदान, शिक्षकांना योग्य सन्मानाच्या मागणीसाठी शिक्षकांनी रविवारी वज्रमुठ उगारली. चार हजाराहून अधिक शिक्षकांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पडत्या पावसामध्ये दिव्यांगांसह महिला शिक्षक उत्साहात सहभागी झाले.

उस्मानाबादेत आर्य समाज येथून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली. शासन धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी एकला सुरू झालेला मोर्चा अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर शिक्षक नेत्यांची जोरदार भाषणे केली. जुनी पेन्शन योजना लागू करून सध्याची अंशदायी पेन्शन योजना लागू करावी, निकषपात्र शाळा, वर्ग, तुकड्यांना अनुदान देण्यात यावे, शिक्षकांना १०, २०, ३० अशा लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर देण्याऐवजी पात्रतेच्या दिनांकापासून लागू करण्यात यावी, अशा २० मागण्या मोर्चात करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने यांनी केले. विभागिय सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, फारुख जमादार, एस. एस. तिर्थकर, विक्रम मायाचारी, पी. एस. शिंदे, व्ही. जी. पवार, डी. के. भोसले, डी. एम. बनसोडे, सी. एन. माळी, जी. एच. देडे, एस. के. दराडे, पी. एस. पाटील, व्ही. बी. गायकवाड, एस. बी. डोके, एस. एस. विभूते आदींची यावेळी उपस्थिती होती.

शिक्षकांचे हित जोपासणारा आमदार हवा
मोर्चानंतरच्या सभेत विभागीय अध्यक्ष विश्वासराव म्हणाले की, मराठवाडा शिक्षक संघाचे राजाभाऊ उदगीरकर, पी. जी. दस्तुरकर, प. मा. पाटील, डी. के. देशमुख आमदार असताना शिक्षक कधीच अडचणीत आले नाहीत. शिक्षकांवर अन्याय झाला तर ते पेटून उठत. आता राजकीय लोक शिक्षक मतदार संघात घुसल्याने शिक्षकांचे प्रश्न कोणीही तळमळीने मांडत नाहीत, यामुळे पुन्हा संघ सक्षम करून शिक्षक असलेला आमदारच निवडणून आणण्यासाठी सर्वांनी निर्धार करावा.

शिक्षक संघ मजबूत करणार
सभेत जिल्हाध्यक्ष शेरखाने म्हणाले की, मराठवाडा शिक्षक संघ मजबूत झाला तरच शिक्षकविराेधी निर्णय थांबवण्यास मदत होणार आहे. शिक्षकांचे नेतृत्व राजकीय पक्षांच्या हातात देऊन, काय अवस्था झाली, ते आपण पाहत आहोत. यामुळे आता राजकीय नेतृत्व झुगारून पुन्हा एकदा मराठावाडा शिक्षक संघ मजबूत करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकाच झेंड्याखाली यावे, अन्यथा आगामी काळ शिक्षकांसाठी आणखी कठीण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...