आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील तेर गावातून जाणाऱ्या तेर-जागजी, कोंड-भेटा रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अंदाज येत नसल्याने प्रवाशांना मार्ग काढणे कठीण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तेर ते जागजी रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. हा राज्य मार्ग दर्जाचा रोड असूनही साबां विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दररोज किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे या रोडवरुन पायी जाणेसुद्धा जिकरीचे झाले आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरुन या रोडवरुन प्रवास करावा लागत आहे. चारचाकी वाहनांचे तर या रोडवरुन मार्गक्रमण करताना प्रचंड हाल होत आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना एकही खड्डा चुकवता येत नाही.
खड्ड्यांमध्ये पाणी साचून अंदाज येत नसल्याने घडतात अपघात
शेतातून ये-जा मुश्किल
तेर ते जागजी रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तेर येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी याच रोडवर आहेत. रोडवर खड्डे व त्यात पाणी साचल्याने शेतातून येणे-जाणे मुश्किल झाले आहे. शेतकरी व वाहनधारकांच्या सोयीसाठी या रोडवरील खड्डे तत्काळ बुजवावे. यामुळे पावसाळ्यात होणारा त्रास वाचेल.
सचिन पांढरे, शेतकरी, तेर.
खड्डे बुजवण्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
जागजी ते उस्मानाबादकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. शिवाय तेर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी याच रस्त्यावर येतात. त्यामुळे दररोज शेकडो शेतकरी या रोडवरुन ये-जा करतात. या रोडवरील खड्डे दरवर्षी बुजवले जातात, परंतु पाऊस आला की पुन्हा खड्डे जैसे थे होतात. त्यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पुलाच्या नळ्याही उघड्या पडल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.