आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डीआरटीच्या कचाट्यातून तेरणा ची सुटका होईना ; ढोकी येथे आज शेतकऱ्यांचे आंदोलन

ढोकी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठा असलेला ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निविदा प्रक्रिया प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने २१-२२ चा गाळप हंगाम पार पडला नाहीच, परंतू अपेक्षित असलेल्या २२-२३ चा सुद्धा हंगाम पार पडेल की नाही, अशी शंका असल्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून होत असून मंगळवारी (दि.१३) ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मागील नऊ वर्षापासून बंद आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१२ कोटी रूपये थकीत कर्जासाठी कारखान्याची निविदा प्रक्रिया राबवून भैरवनाथ शुगरला २५ नोव्हेंबर २०२१ रोजी तेरणा कारखाना २५ वर्षांच्या भाडे कराराने देण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने घेतला. निर्णयाच्या विरोधात प्रक्रियेत सहभागी करून घेतले नाही तसेच राबवलेल्या प्रक्रियेवर आक्षेप घेत ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

त्यानंतर खंडपीठ ते डीआरटी न्यायाधिकरण अशा सुनावणी पार पडत १७ जून रोजी डीआरटी न्यायाधिकरणाने तेरणा साखर कारखान्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देत ट्वेन्टीवन शुगरची याचिका निकाली काढल्याने तेरणाचा ताबा भैरवनाथ शुगरकडे राहणार होता. परंतु या निकालाविरोधात ट्वेन्टीवन शुगरच्या वतीने डीआरएटीत (ऋण वसूली अपीलीय न्यायाधिकरण) धाव घेतली. याप्रकरणी आता १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असून मागील दहा महिन्यांपासून भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगरच्या वादात तेरणा कारखाना डीआरएटी न्यायाधिकरणात अडकला असल्याने २१-२२ चा गाळप हंगाम सुरू झाला नाही.

संघर्षाची तयारी, ऊस उत्पादकांचे आज आंदोलन
२०२१-२२ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही वेळेवर ऊस तुटलाच नाही आणि तुटलेल्या उसाचे आजपर्यंत पैसेही न मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. शासनाने तातडीने तेरणाबाबत न्यायालयात गेलेल्या दोन्ही संस्था राजकीय नेत्यांशी संबंधीत असल्यामुळे दोघांमध्ये समेट घडवावा व कारखाना २०२२-२३ घ्या हंगामात चालू करावा या मागणीसाठी शेतकरी, सभासद, कामगार यांच्या माध्यमातून तयार झालेल्या तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...