आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:तेरणाकाठचा शेतकरी पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त; ट्रॅक्टरचा वापर

तेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोक्यावर सूर्य आग ओकत असताना तेर व परिसरात शेतीच्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाने वेग आला असून तेरमध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यामुळे ट्रॅक्टरसह बैलाच्या सहाय्याने शेतीची मशागत केली जात आहे. सध्या बैलाचे प्रमाण कमी असल्याने सर्वाधिक ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत केली जाते.

उस्मानाबाद तालुक्यात प्रत्येक छोट्यामोठ्या गावातील शेतकरी खरीप हंगाम पूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. ज्यांच्याकडे बैल आहे तो बैलाच्या सहाय्याने तर उर्वरित शेतकरी ट्रॅक्टरद्वारे पंजी व नांगरणी करत आहेत. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारीच्या राशी झाल्या आहेत. त्यामुळे जमिनी मोकळ्या झाल्या आहेत. तेरणा काठचा शेतकरी लवकरात लवकर उन्हाळी मशागत करून जमीन तापेल व कसदार बनेल याचा फायदा खरीप पिकांना होईल म्हणून प्रत्येक जण आपल्या शेतीची उन्हाळी मशागत करत आहे.

यंदा डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी मशागतीच्या कामाच्या दरात वाढ केली आहे. मोजक्या शेतकऱ्यांनी बैलांवर मशागतीची कामे हाती घेतली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरील मशागतीस पसंती दिली आहे. हवामान खात्याने यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकर जमीन भुसभुशीत करण्यावर शेतकऱ्यांचा कल आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ऐन सोयाबीन काढणीच्या वेळेस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. आता मे महिना मध्यावर आला असून पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत करून जमीन पेरणीयोग्य तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे.

यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता
तेर व परिसरात खरीप हंगामातील सोयाबीनचे प्रमुख पीक घेतले जाते. नगदी पीक असल्याने शेतकरी या पिकाकडे वळला आहे. सोयाबीन सोबतच तूर, मुग, व उडीद ही दुय्यम पिके घेतली जातात. यंदा चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना भरभरून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षापासून चांगला पाऊस होत आहे. मात्र, ऐन काढणीच्या वेळेस अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात जाते. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे.

बातम्या आणखी आहेत...