आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि.या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. भ्रष्टाचारास पाठीशी घालणाऱ्या या आंदोलनामुळे काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला असून भ्रष्टाचार आणि असत्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास सत्याग्रहाचा मुलामा चढवून काँग्रेसने महात्मा गांधींच्या मूल्यांना मूठमाती दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पाच हजार देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी जमा केलेल्या पैशातून स्थापन करण्यात आलेल्या ‘असोसिएटेड जर्नल’द्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्रासाठी देशात विविध ठिकाणी मिळालेली सुमारे दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी गांधी परिवाराने यंग इंडियन्स नावाची कंपनी स्थापन करून केवळ ५० लाखांत ही राष्ट्रीय संपत्ती हडप केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी सुनावणीसाठी राहुल गांधी यांना ‘ईडी’ने पाचारण करताच गांधी परिवाराचे भ्रष्ट रूप जाहीर होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी सत्याग्रह आंदोलन सुरू करून जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग चालविला आहे. भ्रष्टाचारी गांधी परिवाराची मर्जी सांभाळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून यासाठी देशाला वेठीस धरण्याचा काँग्रेचा डाव हाणून पाडला जाईल,असा इशाराही नितीन काळे यांनी प्रसिद्धीसाठी जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रीय कार्यासाठी उभारण्यात आलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीचे रियल इस्टेटच्या धंद्यात परिवर्तन करण्याचा गांधी परिवाराच्या भ्रष्ट कमाईचा डाव उघड झाला असून त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे या प्रकरणातून वेशीवर टांगली गेली आहेत. काँग्रेसने स्वतःच आपल्या विसर्जनाचा उत्सव सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.