आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊननंतर पहिलीच यात्रा पावली:तोट्यातील एसटीला चैत्री पौर्णिमेचा आधार; केवळ 5 दिवसांत 51 लाख रुपयांचा नफा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाभरातील १५० बसच्या येरमाळ्याला १३७२ फेऱ्या

लॉकडाऊन, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तोट्यात आलेल्या परिहवहन महामंडळाला काही दिवसांपूर्वी झालेल्या येरमाळा येथील येडश्वरी देवीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेचा थोडा आधार मिळाला. फक्त पाच दिवसातच ५१ लाखांचा निव्वळ नफा झाला. जिल्हाभरातील १५० बसच्या येरमाळ्याला १३७२ फेऱ्या या कालावधीत झाल्या आहेत.

कोरोना लॉकडाऊननंतर काही काळ एसटी बस सेवा सुरळीत झाल्यावर एसटी कर्मचाऱ्यांचे पाच महिने कामबंद आंदोलन चालले. गेल्या महिन्यापासून एसटीची व्यवस्था पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही झालेला तोटा भरून निघाला नाही. दररोजच्या प्रमाणात कशीतरी परिस्थिती स्थिर होत आहे. अशात येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा उत्साहात व पूर्ण क्षमतेने पार पडली. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच अशी यात्रा झाली. यात्रेचा परिवहन महामंडळालाही चांगला आधार मिळाला. यात्रेच्या पाचच दिवसात जिल्ह्यातील एसटीला ५० लाख ७१ हजार ९०० रुपयांचा निव्वळ नफा झाला. यामध्ये प्रवाशांना एसटीने यावेळी चांगली सेवा दिली. गर्दीतून सातत्याने वाट काढताना प्रवाशांची दमछाक होऊ नये म्हणून चारही बाजूंनी तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले होते. प्रवाशांना सातत्याने बसची ये - जा करण्याची वेळ सांगण्यात येत होती. एसटीचे नुकसान या एका यात्रेने भरून निघणारे नसले तरी नफ्याचा थोडाफार तरी आधार मिळाला आहे.

उस्मानाबाद स्थानकातून सर्वांधिक फेऱ्या
जिल्ह्यात एकूण १५० बसच्या माध्यमातून येरमाळ्याला १३७२ फेऱ्या करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक ३३२ फेऱ्या उस्मानाबादच्या आगाराच्या झाल्या. ३३ हजार ३०० किलोमीटरचा येथील बसचा प्रवास झाला. यानंतर भूमच्या बसचा २७८ फेऱ्यातून २३ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास झाला. तुळजापूरच्या बसचा २५० फेऱ्यातून २६ हजार २००, कळंबच्या बसचा २१५ फेऱ्यातून ३२ हजार ५००, परंड्याच्या बसचा २०० फेऱ्यातून १० हजार ९००, उमरग्यातून ९८ बसच्या फेऱ्यांनी ११ हजार ५०० किलोमीटर प्रवास झाला.

सर्वच आगारातून उत्पन्न
उस्मानाबाद अागाराचे १३ लाख २०० रु., कळंबचे ११ लाख ८६ हजार ७०० रु., तुळजापूरचे ९ लाख ८९ हजार ८००, भूमचे सात लाख ८९ हजार २०० रु, उमरग्याचे ७ लाख ५० हजार ५००, कळंब आगाराचे ३ लाख ५३ हजार ९०० रुपयांचे उत्पन्न मिळाले.

तेर, सोनारीतूनही फायदा
तेर येथील संत गोरोबाकाकांच्या समाधी सोहळ्यानिमित्त यात्रा भरते. सोनारीतही काळभैरनाथाच्या दर्शनासाठी गर्दी होते. दोन्ही यात्रांतून एसटीला सुमारे २० लाखांचा फायदा होईल. अद्याप परिवहन महामंडळाने यात्रांचा ताळेबंद तयार केला नाही.

खासगी वाहतुकीस द्यावी लागणार टक्कर
पाच महिन्यांच्या संपादरम्यान खासगी वाहतुकदारांची चांदी झाली. खासगी वाहतुकीची पाळेमुळे जिल्ह्यात आणखी घट्ट रोवली गेली आहे. यामुळे आता चालक व वाहकांनी तत्पर व संवेदनशीलपणे सेवा देण्याची गरज आहे. अन्यथा खासगी प्रवासी वाहतूक व्यवस्था एसटीचे आणखी नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाहेरील जिल्ह्यातूनही बस
अन्य जिल्ह्यातूनही खास येरमाळ्याच्या यात्रेसाठी बस सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये बीड जिल्ह्यातील तब्बल ८० बस सातत्याने फेऱ्या करत होत्या. तसेच लातूरहून २० तर सोलापूरहूनही २५ बसच्या फेऱ्या सुरू होत्या. या बसेसनेही चांगला व्यवसाय केला. आंदोलनानंतर वाहक व चालकही उत्साहात कामाला लागले आहेत. याचा चांगला फायदा एसटी महामंडळाला होत आहे.

बातम्या आणखी आहेत...