आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या नियोजनाची तयारी निवडणूक विभागाकडून सुरू झाली आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी मागील पंचवार्षिक काळात मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यास सुरुवात केली आहे. नवीन इच्छुकांकडून विकासकामे मंजूर करुन आणल्याची बतावणी करुन गट व गणात स्वतःचे बॅनर लावले जात आहेत. उमरगा तालुका स्थानिक स्वराज्य संस्थेत आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला सोडून स्वतंत्र महाविकास आघाडी होईल की निवडणूक लढवण्याचा निर्णय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाविकास आघाडी झाली तर सर्वाधिक जागा काँग्रेसला सोडाव्या लागतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी होवू शकते. आघाडीत समान जागा वाटप झाल्यास अंतर्गत खेळीतून पाडापाडीचे राजकारण होण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांतून होत आहे. गत पंचवार्षिक काळात काँग्रेस ५, भाजप २ तर राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल होते. पंचायत समितीत काँग्रेसचे ९, भाजप ३, राष्ट्रवादी ४ तर शिवसेनेच्या २ जागा, असे पक्षीय बलाबल होते.
अनेकांनी आणला निधी, मतदारांतून होतेय निकृष्ट कामांची ओरड भाजपचे ॲड.अभय चालुक्य यांना अडीच वर्षाच्या अर्थ व बांधकाम सभापती काळात व त्यानंतरच्या काळात तुरोरीसह अन्य गटात विकास कामास कोट्यवधीचा निधी आणला. समाजकल्याण सभापती काळात दिग्विजय शिंदे यांनी जिल्ह्यात विकास कामांसाठी प्रयत्न केले. शरण पाटील यांनी आलूर गटातील गावात कामे केली आहेत. सत्ता नसताना काँग्रेसचे गटनेते प्रकाश आष्टे यांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी खेचून कामे केली. दरम्यान, प्रत्येक जिप सदस्यांनी विकास निधी खेचून आणला. परंतु कामांचा दर्जा निकृष्ट असल्याची मतदारांची ओरड सुरू आहे.
दोन जिल्हा परिषद गटांची नावे बदलली तालुक्यातील कुन्हाळी गटाचे तलमोड आणि कवठा गटाचे पेठ सांगवी असे नामकरण झाले आहे. नव्याने झालेल्या पेठसांगवी गटात उद्योजक महेश देशमुख निवडणुकीच्या तयारीत असून गटातील गावांमध्ये स्वतः रक्कम खर्चून काही कामे केली. एक कोटी रुपयाची कामे मंजूर करून घेतली मात्र ते कोणत्या मार्गाने कामे मंजूर करून आणतात, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काही कामे रद्द केल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून झाल्यावर आमदार चौगुले यांनी त्याचे खंडण केले. जिल्हा परिषद माजी सदस्य शेखर घंटे यांनी गत पंचवार्षिक काळात विविध योजनेतून विकास कामे केली. मात्र दिखावा केला नाही. आता त्यांचे समर्थक सोशल मीडियावर कामाचा लेखाजोखा मांडत आहेत. दरम्यान, आमदार चौगुलेंचे अनेक पक्षात मित्रत्वाचे संबंध आहेत. गेली तीन टर्म प्रतिनिधीत्व करत असताना जिल्हा परिषद, पंचायत समितीवर वर्चस्व निर्माण करण्यात त्यांना यश आले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.