आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंबीयांना तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्यमान भारत कार्ड जिल्ह्यात केवळ ७५ हजार ४३७ जणांनी काढले होते. गेल्या १५ दिवसांत कार्ड वाढवण्यासाठी अॅक्शन प्लॅन जिल्हा परिषदेने तयार केला होता. मात्र, ३१३ चीच यामध्ये वाढ झाली आहे. प्रत्यक्षात याचे लाभार्थी जिल्ह्यात चार लाख ३२ हजार २१५ आहेत.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार जिल्ह्यातील प्रतिथयश खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांची निवडही करण्यात आली आहे. मात्र, लाभार्थींकडून या योजनेसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. लाभार्थींना अनेक दिवसांपासून शासकीय यंत्रणांकडून योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्ड घेण्याबाबत आवाहन करण्यात येत होते. परंतु, कार्ड काढून घेण्यासाठी योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
एक लाख ३२ हजार ८४ कुटुंबाची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. कुटुंबातील चार लाख ३२ हजार २१५ सदस्यांना यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, दुर्धर आजारावर उपलब्ध असलेल्या सुविधा यांचा विचार करून आॅनलाईन पद्धतीनेच या लाभार्थींची मागेच निवड करण्यात आली होती. परंतु, यापैकी केवळ ७५ हजार ४३७ जणांचेच कार्ड काढण्यात आले होते. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कार्डधारकांची संख्या वाढण्यासाठी येत्या १५ दिवसांची योजना तयार केली. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत तसेच ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना यामध्ये सामिल करून घेण्यात आले होते. परंतु, याला पुन्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. केवळ ३१३ कार्डची यामध्ये भर पडली आहे. यामुळे आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
१३०९ आजारांवर उपचार सर्व कर्करोग, हृदयविकार, मुत्राशयाचे आजार, डोळे, कान, दाताशी संबंधित आजार, वेडसरपणा, हाडाचे आजार अशा १३०९ आजारांवर या योजनेतून खासगी रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मिळणार आहेत. यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वकांक्षी योजना असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
लाभार्थींची माहिती नसल्याने अडचण पूर्वी या योजनेचे नेमके कोण लाभार्थी आहेत, याचीच माहिती नसल्यामुळे कार्ड काढण्यासाठी अडचणी येत होत्या. यानंतर यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना याद्या देण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी आॅनलाईन लिंकही तयार करण्यात आली आहे. यातूनच नागरिकांना आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का, याचा शोध घेता येणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांचा आढाव्यात भर जिल्ह्यात नुकताच दोन महत्त्वाच्या केंद्रीय मंत्र्यांचा जिल्ह्यात दौरा झाला. यामध्ये आरोग्य मंत्री भारती पवार तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बैठका घेतल्या. दोघांनीही आयुष्यमान भारत कार्ड लाभार्थींनी काढून घेण्याबाबत आवाहन केले. त्यांच्या दौऱ्यादरम्यानही कार्डची संख्या अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्यात १,३२,०८४कुटुंबांची निवड,४,३२,२१५ लाभार्थी, ७५,७५०कार्डचे वितरण, ३१३कार्डचीच १५ दिवसात नोंदणी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.