आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमुळे शहराला गेम फिव्हर

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेला रविवारी शानदार सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशीच प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पहिल्यांदाच अशी राष्ट्रीय स्पर्धा होत असल्यामुळे शहराला “गेम फिव्हर’ चढला आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेच्या आयोजनामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेले उस्मानाबादचे खेळाडूही दाखल झाले आहेत. येथे प्रथमच राष्ट्रीय खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामुळे संपूर्ण उस्मानाबाद शहरात संपूर्ण वातावरण खो खोमय झाले आहे. शहराला जणू “गेम फिव्हर’ चढल्याचे वातावरण तयार झाले आहे. सायंकाळी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, स्पर्धेला सकाळीच सुरुवात झाली होती. यावेळी महिला गटातील नऊ तर पुरूष गटातील आठ सामने खेळवण्यात आले. सर्वच सामन्यांसाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती.

सकाळच्या गुलाबी थंडीत खो खोच्या स्पर्धकांनी दाखवलेल्या खेळाचे कौतुक उस्मानाबादमधील सर्व प्रेक्षकांनी केले. सर्वच सामने पाहून केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर अन्य राज्यांच्या संघांचीही प्रेक्षकांनी वाहवा केली. सायंकाळच्या उद्धटनाच्या कार्यक्रमालाही प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. प्रेक्षकांसाठी उभी करण्यात आलेली गॅलरी भरली होती. अनेकांनी मैदानात उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. सर्व खेळाडूंनी पाहूण्यांना संचलन करून सलामी दिली. यावेळी महाराष्ट्राचा संघ आल्यानंतर घोषनांनी परिसर दणाणून गेला होता.

खडे वेचून खो-खो खेळलो
आताच्या काळात व जुन्या काळातील खो - खो फार वेगळे होते. काही नियमांमध्ये बदल झाले असतील. मात्र, आता मॅट आल्यामुळे खेळ आणखी सहज झाला आहे. पूर्वी आम्हाला मैदानात अगोदर खडे वेचून खेळावे लागत होते. आता अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. यामुळे खेळाडूंना चांगली संधी आहे. उस्मानाबादच्या खेळाडूंनी या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे. त्यांना प्रोत्साहन देणारी एक वेगळी व्यवस्थाच शहरात निर्माण झाली आहे. याचा खुप आनंद वाटतो.-अनिता दिवटे (१९८३ च्या खेळाडू)

उस्मानाबादमध्ये चांगले वातावरण
उस्मानाबाद जिल्ह्यात खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे खेळासाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. आता ही चांगली बाब आहे. पूर्वीही प्रोत्साहन मिळत होते. आता राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याइतपत उस्मानाबादची क्षमता निर्माण झाली, याचे मोठे कौतुक वाटत आहे. उस्मानाबादची खो खोची टीम चांगली तयार झाली आहे. तसेच खेळाडूंना सहकार्य करणारेही भरपूर आहेत. यामुळे अनेक खेळाडू येथे तयार झाले. पुढेही तयार होतील, अशी अपेक्षा आहे.-डॉ. वृषाली वारद (१९८४ च्या खेळाडू)

अनेक खेळाडू घडवता आले
मला शालेय जीवनापासून खो खोची आवड आहे. मला माझ्या आवडीमुळे शिक्षक म्हणून काम करताना खो खोचे खेळाडू घडवता आले. उस्मानाबादमध्ये पूर्वीच्या काळापेक्षा आता चांगले वातावरण आहे. उस्मानाबादने राज्य व देशाला अनेक खो खाेचे खेळाडू दिलेले आहेत. ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. आता तर राष्ट्रीय स्पर्धांमुळे याला आणखी वेग येणार आहे. नवोदित खेळाडूंनी ही स्पर्धा बारकाईने पाहावी, त्यांना त्यांच्या क्रीडा जीवनात चांगला उपयोग होईल.-कल्पना देशमुख (शिक्षिका व खेळाडू)

खो -खोमुळे खिलाडूवृत्ती वाढते
खो खो सारख्या खेळामुळे खिलाडू वृत्ती वाढते. जीवनात एखाद्यावेळी पराभव पत्कारावा लागला तर निराशा येत नाही. या खेळातून स्वत:च्या जीवनात वेगळे आचरन करता येते. ३० वर्षांपूर्वी आम्हाला खो खो खेळ शिकवणाऱ्या गुरूजनांचा येथे सत्कार होत आहे. खो खोतील नवी पिढी जुन्या पिढीला विसरलेली नाही. त्यांच्या अनुभवाचा नवीन खेळाडूंना चांगला फायदा होणार आहे. उस्मानाबादकरांनी खो खोला अशीच साथ दिली तर शहराचे नाव उंचीवर जाईल.-मनिषा जगदाळे - जंजिरे, (१९९२)

बातम्या आणखी आहेत...