आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाड्या:शहरात स्वच्छतेवर महिन्याला 48 लाख खर्च,15-15 दिवस घंटागाड्या येईनात ; पालिकेत प्रशासनराज; कर्मचारी, अधिकाऱ्यांवर अंकुश नाही

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर स्वच्छतेसाठी, कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिका दर महिन्याला थोडा थोडका नव्हे ४८ लाख रुपये खर्च करत आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल. त्याचे कारण शहरातल्या अनेक भागात तब्बल १५-१५ दिवस घंटागाडीच येत नाही. स्वच्छता होत नाही, मग नागरिकांच्या खिशातला हा पैसा जातो कुणाच्या घशात, असा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. गेल्या ५ महिन्यांपासून पालिकेत प्रशासनराज सुरू आहे. पालिकेच्या निवडणुकांचा कालावधी संपून जवळपास ५ महिने झाले. पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कुणाचाही अंकुश उरलेला नाही. नगरपालिका नागरिकांच्या मालमत्ता करातून रक्कम जमा करते. त्यातून नागरिकांना पाणी, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पथदिवे आदी मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी असताना उस्मानाबाद नगरपालिकेला या कामांचा विसर पडला असावा, अशी सद्यस्थिती आहे. शहरात स्वच्छतेच्या नावाने ओरड सुरू आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर कचऱ्यासाठी घंटागाड्या येतात. मात्र, ठेकेदार कंपनीने कचरा संकलनासाठी एक दिवसाआड प्रभागात जावे, असे निविदेत नमूद आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची स्वच्छताही होत नाही. मात्र, यासाठी महिन्याला ४८ लाख रुपये पालिकेमार्फत मोजले जातात, हे विशेष. एवढी रक्कम खर्चूनही नाल्या तुंबलेल्या दिसतात. घंटागाड्या फिरकत नाहीत.यासंदर्भात स्वच्छता निरीक्षक सुनिल कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घंटागाड्या सुरळीत चालू आहेत. कुठेही अडचण येत नाही. त्यांना शहरातील नागरिकांच्या समस्या दिसत नसल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.

नगरसेवक गायब, तक्रार कुणाकडे करायची? पालिकेचा कार्यकाळ संपल्यापासून अनेक भागातील नगरसेवक जनतेच्या संपर्कात नाहीत. निवडणूक लांबल्याने नव्या व जुन्या इच्छुक उमेदवारांनाही जनतेच्या प्रश्नांशी घेणे-देणे दिसत नाही. निवडणुकीची लगबग सुरू होताच नागरिकांच्या समोर येणारे चेहरेही अशावेळी गायब आहेत. त्यामुळे प्रभागात घंटागाडी आली नाही, स्वच्छता झाली नाही तर तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न नागरिकांना पडतो.

स्वच्छता न केलेल्या काळातला मोबदला कशासाठी? पालिकेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करूनही शहरातील स्वच्छतेची समस्या कायम आहे. शिवाय घंटागाड्या फिरकत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. मात्र, घंटागाड्या येत नसतानाही पालिका संबंधित कंपनीला नियमित रक्कम अदा करते. वास्तविक पाहता निविदेतील अटीनुसार ज्या काळात कचरा गोळा केला जात नाही, झाडलोट होत नाही,अशा काळातील मोबदला का अदा केला जातो, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...