आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय दूर:बंद असलेली तुळजापूर-सास्तूर एसटी बस अखेर सुरू, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर

लोहारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर ते सास्तूर बस बंद झाल्याने हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीबद्दल ‘दिव्य मराठी’ने २८ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केलेले होते. याची दखल घेत तुळजापूर आकाराने दुसऱ्याच दिवशी ही बस पुन्हा सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थी व मुख्याध्यापकांनी ‘दिव्य मराठी’चे आभार मानले आहे.

शाळा सुरू झाली परंतु बस बंद असल्याने शाळा गाठायची कशी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. तुळजापूर-सास्तूर बस बंद झाल्याने हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेत येण्यासाठी गैरसोय होत होती. या शाळेत वडगाव देव व बोरनदीवाडी या दोन गावातील ३५ विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी तुळजापूर-सास्तूर बसने सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शाळेत येत होते. ही बस सायंकाळी साडेचारच्या सुमारास परत तुळजापूरला जात होती.

त्यामुळे या बसने हे विद्यार्थी शाळेतून परत गावाकडे जात होते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी ही बस सोयीची होती. परंतु मागील काही दिवसांपासून तुळजापूर ते सास्तूर बस बंद झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आर्थिक फटका बसत होता. हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. तसेच त्यांच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तसेच वडगाव देव व हिप्परगा येथील लोहारा व सलगरा येथील महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती. शैक्षणिक नुकसान टाळून गैरसोय थांबवण्यासाठी तुळजापूर ते सास्तूर ही बस पूर्ववत सुरू होणे आवश्यक होते.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
तुळजापूर ते सास्तूर बस पूर्ववत सुरू झाल्यामुळे विद्यार्थी शुक्रवारी (दि.२९) या बसने सकाळी साडेनऊच्या सुमारास शाळेत दाखल झाले. बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

अभ्यास होणार सुरळीत
कोरोनामुळे आमची दोन वर्षे शाळा झाली नाही. यावर्षी नववीत आलो. पण बस नसल्याने अभ्यासावर परिणाम होत होता. आता बस सुरू झाल्याने आमचा अभ्यास सुरळीत होईल. - मयुरी कोंडिराम कालेकर, वडगाव देव, इ. ९ वी.

खासगी वाहनांची प्रतीक्षा संपली
अनेक वर्षापासुन सुरु असलेली बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. बस सुरु झाल्याने आता विद्यार्थ्यांना खासगी वाहनांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. पर्यायाने त्यांच्या अभ्यासाला गती येईल. -एस. बी. भोयटे, मुख्याध्यापक.

शाळेत येेण्याची अडचण दूर
बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची सोय झाली. आता मला दररोज शाळेत येण्यासाठी अडचण जाणार नाही. तसेच आमचा अभ्यासही नीट होईल. - अंकिता गणपतराव पाटील, वडगाव (देव, इयत्ता. १० वी)

बातम्या आणखी आहेत...