आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेरोनाचे मळभ हटले असून हिंदू नववर्षाची पहाट कोरोना निर्बंध मुक्तीची गुढी घेऊन आली आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानंतर गुरुवारी उशिरा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील लसीकरण वगळता कोरोनाचे सर्व निर्बंध शुक्रवारपासून शिथिल करण्यात आल्याचे आदेश काढले. मात्र, नागरिकांनी मास्क नियमित वापरून नियमांचे पालन केल्यास संसर्गजन्य आजारापासून बचाव होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या छायेत जगत असलेल्या जिल्हावासीयांना अनेक सणवारांनाही मुकावे लागले होते. त्यामुळे दोन वर्ष आनंदोत्सवापासून दुर गेलेल्या नागरिकांना आता नवीन हिंदू वर्ष आशेचा किरण घेऊन आले आहेत. जिल्हाभरात शनिवारपासून (दि.२) कोरोनामुळे लावण्यात आलेले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व सणवार आणि सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, वैयक्तिक कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सर्व कार्यक्रम करत असताना कोरोनासह संसर्गजन्य आजाराला कमी करण्यासाठी लावून दिलेला मास्कचा नियम नागरिकांना कायम पाळावा लागणार आहे.
तसेच हात धुने, सॅनिटायझरचा वापर करणे. याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. विशेष म्हणजे नागरिकांना मास्क वापरावे लागणार आहे. मास्क म्हणून रुमाल, गमचा आणि दुपट्टा वापरता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यामधील सर्व जिल्हे व प्रशासकीय घटकांमध्ये मागील काही आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्याच बरोबर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना बाधित रुग्णसंख्येचा दर आणि बेड्सची संख्या मापदंडांच्या मर्यादेत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॉविड निर्बंध मागे घेण्यात येत आहेत. परंतु नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तन ठेवावे, अशी घोषणा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे.
सुरक्षा हीच ढाल
जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व संस्था यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे (ज्यामध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन इ. चा समावेश आहे) पालन करावे कारण ते व्यक्ती आणि समाजाचे आरोग्य व सुरक्षेकरिता सर्वात मोठी ढाल म्हणून कार्य करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.