आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दीड हजार नारळ झाडांची लागवड करणारे पहिले गाव, सुंदर गाव उपक्रमांतर्गत राबवले अनेक उपक्रम

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जकेकूरवाडीला सीईओंची भरपावसात भेट देत पाहणी

तालुक्यातील जकेकूरवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ‘माझ गाव सुंदर गाव’ अभियान सुरू करण्यात आले. यासाठी लोकसहभागातून तयारी सुरू आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, घरे, मंदिरे व सार्वजनिक ठिकाणी अद्ययावतीकरण व वर्गीकरण, रंगरंगोटी, स्वच्छता अभियान, शंभर टक्के कर वसुली, शाळेसाठी क्रीडांगण, वन्यजीवांना पाणवठा, अंतर्गत गटारी, १५०० नारळांची लागवड आदी उपक्रम राबवले आहेत.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी येथे भरपावसात भेट देऊन पाहणी केली. सीईओंच्या उपस्थितीत शनिवारी दीड हजार नारळ झाडांची लागवड झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोडभरले, पंचायत समिती गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, सहायक गटविकास अधिकारी संतोष वंगवाड, लोहाराचे उपअभियंता सरवदे, पाटबंधारे विभाग उपअभियंता व्ही. एन. देसाई, विस्तार अधिकारी एन. एस. राठोड, पाटील उपस्थित होते. १५०० नारळाची झाडे आंध्र प्रदेश येथील राजमन्द्रि येथून आणली. ती झाडे रस्त्याच्या दुतर्फा व गावात मोकळ्या जागेत लावली. संपूर्ण वृक्षारोपण ग्रामस्थांच्या मदतीने केले. यावेळी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन भीमनगर वस्तीत सिमेंट काँक्रीट रस्ता, जिल्हा परिषद शाळेला सिमेंट रस्ता, सार्वजनिक शौचालय भूमिपूजन, ज्येष्ठ नागरिकासाठी विरंगुळा केंद्र, वाचनालय आदींचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

१५०० नारळ झाडांचे पहिले गाव
जकेकूरवाडी गावात दीड हजार नारळ झाडे लावण्याचा संकल्प साकार झाला. ‘वृक्षावर करा माया मिळेल छाया, एक मूल एक झाड, जगण्याचा संकल्प करा समृद्धी येईल तुमच्या घरा, सुंदर माझा निवारा दारी वृक्षांचा पहारा, झाडे असतील तर आपण असू झाडे नसतील आपण नसू’, म्हणून प्रत्येकाने झाडे लावून संगोपन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक, महिला, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी ३ तास थांबले, ग्रामस्थांना मार्गदर्शन
पाऊस सुरू असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, गोडभरले यांनी तब्बल ३ तास पावसात भिजत गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अमर सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक गणेश माळी, गटविकास अधिकारी कांबळे, विस्ताराधिकारी यांनी ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी नागरिक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...