आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृह ४ वर्षांपासून बंद,परिसर झाला अस्वच्छ

नळदुर्ग |लतीफ शेख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ लगत असलेल्या नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृह हे गेल्या ४ वर्षापासून बंद आहे. त्याची देखभाली अभावी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विश्रामगृहाच्या परिसरात काटेरी झुडपे वाढले असून गवत व पालापाचोळा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शिपाई किंवा चौकीदार नसल्यामुळे लाेकांचे येणे जाणे पूर्णपणे बंद झाले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत डाक बंगला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नळदुर्गच्या शासकीय विश्रामगृहाची अवस्था हॉरर फिल्म बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रामसे ब्रदर्स च्या चित्रपटातील भूत बंगल्यासारखी झाली आहे. तसेच या ठिकाणी श्वानासह इतर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाची तात्काळ दुरुस्ती व स्वच्छता करून विश्रामगृहाला गत वैभव प्राप्त करून द्यावी अशी मागणी होत आहे.

नळदुर्ग येथे प्राचीन व ऐतिहासिक किल्ला, श्री खंडोबा देवस्थान, श्री क्षेत्र रामतीर्थ, नानीमाँ सरकार दर्गाह आहे. तसेच नळदुर्ग हे तुळजापूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे तुळजाभवानी माता व श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला जाणारे भाविक तसेच ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटन नळदुर्ग शहरात आल्यानंतर विश्रांतीसाठी पूर्वी याच शासकीय विश्रामगृहात थांबत होते. मात्र सध्या हे विश्रामगृह बंद असल्यामुळे नळदुर्ग शहरात येणाऱ्या पर्यटकासह भाविकांची गैरसोय होत आहे.

या विश्रामगृहामध्ये एक व्हीआयपी सुटसह ४ जनरल सुट आहेत. मात्र सध्या त्याचीही दुरवस्था झाली आहे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे येथे रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. एकेकाळी हे शासकीय विश्रामगृह डाक बंगल्या नावाने प्रसिद्ध होते. या शासकीय विश्रामगृहात, सिने अभिनेते, मंत्री, विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, हैदराबादचे नवाब तसेच शासनाचे विविध खात्यातील अधिकारी या ठिकाणी मुक्कामासाठी राहत होते.

त्याचबरोबर त्यावेळी नळदुर्ग शहरात पोलीस वसाहत नसल्यामुळे नळदुर्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अधिकारी देखील या ठिकाणी असलेल्या सूट मधील काही खोल्यांचा राहण्यासाठी वापर करीत होते त्यामुळे त्यावेळी हे विश्रामगृहात स्वच्छता होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यानी नळदुर्ग शहरवासीयांची व शहरात येणाऱ्या पर्यटक व भाविकांची गरज लक्षात घेऊन शासकीय विश्रामगृह पूर्वीप्रमाणे सुरू करून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.

इतकी अनास्था कशी?
इसवी सन १९३० साली बांधण्यात आलेले हे शासकीय विश्रामगृह गेल्या ४ वर्षापासून धूळखात पडले आहे. हे विश्रामगृह पुन्हा सुरू झाले तर नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांसाठी व परिसरातील तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. जर या विश्रामगृहाची अशीच अवस्था राहिल्यास येणाऱ्या काळात नळदुर्ग ची ओळख असलेला हा विश्रामगृह इतिहास जमा होण्याची शक्यता नाकारता येत आहे.

बातम्या आणखी आहेत...