आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विमान‘तळाला’, 14 वर्षांपूर्वी झाली होती दुरुस्ती, रिलायन्स कंपनीला करारावर दिला होता रन-वे, मंत्र्यांनाही विमानाने येता येईना

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद विमानतळाच्या धावपट्टीची खडी उखडली असून विमानाच्या लँडिंगसाठी विमानतळ व्यवस्थापकांकडून परवानगी दिली जात नाही. मराठवाड्यातील एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्रही बंद पडले आहे. कंपनीने हे केंद्र गुजरातला स्थलांतरित केले आहे. गेल्या ३ वर्षांपासून उस्मानाबादचे विमानतळ केवळ नावापुरते उरले. मंत्री, उद्योगपती किंवा बड्या राजकीय नेत्यांना उस्मानाबादला विमानाने येता येत नाही. त्यामुळे सोलापूर, लातूरपर्यंत विमानाने येऊन पुन्हा कारने उस्मानाबादला यावे लागते.

२००८ मध्ये ९०० मीटर असलेली धावपट्टी १२५० मीटर केली होती. त्यानंतर धावपट्टी रिलायन्स कंपनीने भाडेतत्त्वावर घेतली. रिलायन्सकडून धावपट्टी करारावर घेऊन बारामतीच्या ब्लू रे एव्हिएशन कंपनीने २०१३ मध्ये उस्मानाबाद विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. मात्र अडचणींमुळे काही वर्षांतच प्रशिक्षण केंद्र बंद झाले.

२०१९ पासून एकही विमान उतरू शकले नाही
२०१७ मध्ये बारामतीकरांनी विमानांसह केंद्राच्या साहित्याची अहमदाबाद येथील कंपनीला विक्री केली. २०१८ मध्ये गुजरातस्थित कंपनीने प्रशिक्षण केंद्र सुरू केले. मात्र धावपट्टीवरील खडी उखडत चालल्याने कंपनीने रिलायन्सकडे वारंवार मागणी करूनही धावपट्टीची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे कंपनीने करार मोडून प्रशिक्षण केंद्र अहमदाबादला नेला. या कंपनीकडे ८ विमाने होती. २०१९ पासून उस्मानाबादेत एकही विमान उतरू शकलेे नाही.

पत्र दिले, धावपट्टी दुरुस्तीसाठी पाठपुरावा करू
उस्मानाबादचे विमानतळ बंद असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या विमानांना लँडिंग करता येत नाही तसेच प्रशिक्षण केंद्रही बंद पडले आहे. त्यामुळे धावपट्टीची दुरुस्ती व्हावी यासाठी रिलायन्सला तसेच उद्योगमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला आहे. धावपट्टीची दुरुस्ती व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार.

टेकऑफपेक्षा लँडिंगला अपघाताचा धोका
ब्लू रे एव्हिएशन कंपनीने उस्मानाबाद विमानतळावरून आठही विमाने गुजरातला नेली. ७ विमाने वर्षापूर्वीच, तर एक विमान ६ महिन्यांपूर्वी नेले. रिलायन्सचे ४ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. दरम्यान, धावपट्टीवरून टेकऑफ करताना तुलनेने कमी असतो. मात्र लँडिंगला अधिक धोका असतो, असे जाणकार सांगतात. दरम्यान, प्रतिक्रियेसाठी विमानतळ व्यवस्थापक श्रीराम पद्मे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

उस्मानाबाद तालुक्यातील स्थानिकांचा रोजगार गेला
प्रशिक्षण केंद्रामुळे उस्मानाबाद तालुक्यातल्या विविध गावांतील ५० ते ६० जणांना रोजगार मिळाला होता. वैमानिक प्रशिक्षणार्थींच्या निवासासाठी खोल्यांची गरज होती. उस्मानाबादकरांच्या व्यवसायात काही प्रमाणात भर पडत होती.

विमानतळाचा इतिहास
950 मीटर २००८ पूर्वीची धावपट्टी
1250 मीटर विस्तारित धावपट्टी
2013 मध्ये सुरू झाले होते प्रशिक्षण केंद्र
08 विमाने प्रशिक्षण केंद्रासाठी
2017 मध्ये बारामतीकरांनी विकली विमाने
2018 ला पुन्हा प्रशिक्षण केंद्राची सुरुवात
2020 मध्ये प्रशिक्षण केंद्राला लागले टाळे

५०-६० तरुणांचा रोजगार हिरावला १४ वर्षांपूर्वी झाली होती दुरुस्ती, रिलायन्स कंपनीला करारावर दिला होता रन-वे, मंत्र्यांनाही विमानाने येता येईना उस्मानाबादच्या १२५० मीटर धावपट्टीवरील खडी उखडली, विमानाच्या लँडिंगला मिळेना परवानगी, प्रशिक्षण केंद्र बंद, कंपनी गुजरातला

बातम्या आणखी आहेत...