आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील अनेक भागात वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. वाढते शहरीकरण व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यजीव चारा-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येत आहेत. शुक्रवारी (दि. ६) सकाळी सातच्या सुमारास पाण्याच्या शोधात आलेल्या हरणावर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याने हरीण गंभीर जखमी झाले व त्यातच त्याचा मृत्यू झाला. कोरेगाव शिवारात पहाटेच्या सुमारास हरीण पाण्याच्या शोधात शिवारात आले होते. या वेळी ते कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण जखमी झाल्याचे पाहून शेतकरी व होमगार्ड तानाजी सूर्यवंशी यांनी तातडीने वन विभागास माहिती दिली.
त्यानंतर वनरक्षक टी. ए. डिगोळे, वनमजूर भुरे, शुभम सानप, चालक शिवाजी जगताप यांनी तातडीने जखमी हरणाला पशुचिकित्सालयात नेले. परंतु हरणाचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करुन वनक्षेत्रात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यात मागील दोन महिन्यात हरीण व काळविटाचा मृत्यू झाला. तसेच माकडांच्या धुडगूस आष्टा जहागीर येथील पाच-सहा घरांची मोडतोड झाली आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी ३३ हून अधिक तलावासंह नदी, नाले, ओढे आहेत. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात होते. सद्यस्थितीत उन्हाळ्यात शेत-शिवारात पिके नसल्याने आणि जंगलातील गवतासह चारा नाहीसा झाल्याने चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील अनेक भागातील पानवठ्यात टँकरद्वारे वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडण्यात येते. परंतु पेठसांगवी बेटजवळगा, कोरेगाव, व्हंताळ परिसरातील पाणवठे कोरडे पडले आहेत. वनक्षेत्रातील हरीण, काळवीटासह प्राणी, जीव उन्हाच्या दाहकतेने व्याकुळ झाले आहेत. चारा-पाण्याच्या शोधात आता शेतशिवारासह मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे. वन्यजीवांसाठी वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यजीव प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे.
सततची दुष्काळीस्थिती, उन्हाच्या तीव्रतेमुळे मानवी वस्तीत येणाऱ्या वन्यजीव प्राण्यांचे यापूर्वी वाहनांच्या अपघातात धडक बसून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एक वर्षापूर्वी गुगळगाव शिवारात हरण मारल्याची घटना घडली होती. मात्र क्षणातच ते गायब झाले. कलबुर्गी-लातूर मार्गावर वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू झाला होता, मात्र याची माहिती वनविभागाला मिळालीच नव्हती. तीन वर्षापूर्वी काळवीट व हरणाची शिकार करणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली होती.
त्यामुळे या परिसरात शिकाऱ्याची टोळी असल्याचे नागरिक सांगतात. मात्र याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अशा घटना घडत आहेत. त्यासाठी वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाने सक्रिय राहून रात्रीची गस्त वाढवून काम करणे गरजेचे आहे असे मत प्राणी मित्रांकडून व्यक्त केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.