आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा संकट:कोरोना पॉझिटिव्हचा आकडा प्रतिदिनी गेला आठवर, चिंतेचे वातावरण वाढले

उस्मानाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसऱ्या लाटेनंतर २७ मे रोजी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीला प्रति दिनी एक ते दोनवर असलेला रुग्णांचा आकडा आता प्रतिदिनी आठवर पोहोचला आहे. यामुळे नागरिकांसह आरोग्य प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी नागरिकांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनापासून धोका टाळण्यासाठी नागरिकांनी लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस घेण्याची गरज आहे. मात्र, १८ ते ६० पेक्षा अधिक वयोगटाने पहिला डोस ८४ टक्के तर दुसरा डोस ६३ टक्के नागरिकांनी घेतला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चौथ्या लाटेची पाल चुकचुकताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेनंतर जवळपास दोन महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निरंक होते. मात्र, तिसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदा २७ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून अपवाद वगळता प्रति दिनी नवे दोन रुग्ण निघत होते. बुधवारी (दि.२२) एकाच दिवशी ८ नवे रुग्ण आढळले असून २६ रुग्ण उपचाराखाली आहेत. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, नागरिकांकडून कोणत्याच प्रकारची काळजी घेतली जात नाही.

सध्या वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे कोरोनासह अन्य साथीचे आजार बळावत आहेत. यामध्ये कोरोनाची साथ बळावू नये, यासाठी सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. यामध्ये पहिल्या लाटेत नागरिकांना मोठ्या संकटाला तोंड दिले आहे. दुसऱ्या लाटेत लस उपलब्ध झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते.

त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा स्वास टाकला. मात्र, प्रत्येक वेळी कोरोना नव्या व्हेरिएंटमध्ये येत असल्याने आरोग्य प्रशासनाची धावपळ होत आहे. यासाठी नागरिकांनी स्वत:हून सार्वजिनिक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून गर्दीत तोंडाला मास्क लावण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ हजार २११ नागरिक बाधित झाले असून ७२ हजार ६७ नागरिक बरे झाले आहेत.

तसेच २६ रुग्ण उपचाराखाली आहेत. २७ मे २२ जूनपर्यंत ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर २६ रुग्ण उपचाराखालील आहेत. अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास आगामी काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून पाणी साठून व घाणीमुळे साथीचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोरोनाने पुन्हा रौद्र रुप धारण केल्यास आरोग्य विभागाचा ताण वाढून नागरिकांची गैरसोय होणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी कोरोनाच्या निकषाचे पालण करण्याची गरज आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...