आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिसऱ्या लाटेनंतर २७ मे रोजी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीला प्रति दिनी एक ते दोनवर असलेला रुग्णांचा आकडा आता प्रतिदिनी आठवर पोहोचला आहे. यामुळे नागरिकांसह आरोग्य प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी नागरिकांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनापासून धोका टाळण्यासाठी नागरिकांनी लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस घेण्याची गरज आहे. मात्र, १८ ते ६० पेक्षा अधिक वयोगटाने पहिला डोस ८४ टक्के तर दुसरा डोस ६३ टक्के नागरिकांनी घेतला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चौथ्या लाटेची पाल चुकचुकताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेनंतर जवळपास दोन महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निरंक होते. मात्र, तिसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदा २७ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून अपवाद वगळता प्रति दिनी नवे दोन रुग्ण निघत होते. बुधवारी (दि.२२) एकाच दिवशी ८ नवे रुग्ण आढळले असून २६ रुग्ण उपचाराखाली आहेत. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, नागरिकांकडून कोणत्याच प्रकारची काळजी घेतली जात नाही. सध्या वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे कोरोनासह अन्य साथीचे आजार बळावत आहेत. यामध्ये कोरोनाची साथ बळावू नये, यासाठी सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरण्याची गरज आहे.
नागरिकांनी कोरोनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. यामध्ये पहिल्या लाटेत नागरिकांना मोठ्या संकटाला तोंड दिले आहे. दुसऱ्या लाटेत लस उपलब्ध झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा स्वास टाकला. मात्र, प्रत्येक वेळी कोरोना नव्या व्हेरिएंटमध्ये येत असल्याने आरोग्य प्रशासनाची धावपळ होत आहे. यासाठी नागरिकांनी स्वत:हून सार्वजिनिक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून गर्दीत तोंडाला मास्क लावण्याची गरज आहे.
कोरोना वाढल्यास काळजीची गरज
लस नसल्यामुळे पहिल्या लाटेत अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत लस आल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. तिसऱ्या लाटेतही मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, अद्याप बहुतांश नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी लस घेतली नाही. कोरोना वाढल्यास व लागण झाल्यास लस न घेतलेल्या नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हर घर दस्त योजनेतून २० हजार २९८ जणांना दिली लस
जिल्ह्यात लसीकरण व्हावे, यासाठी हर घर दस्तक योजना १ जूनपासून राबवण्यात येत असून २० जून पर्यंत पहिला डोस २१०८, दुसरा डोस १०९०० तर तिसरा डोस ७२९० जणांनी घेतला आहे. अशा एकूण २० हजार २९८ नागरिकांनी लस घेतली आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरी जाऊन लस देण्यात येत आहे. याचा लाभ लाभाथ्र्यांनी घेण्याची गरज आहे.
रुग्णालयात डोस उपलब्ध
हर घर दस्तक अभियानामार्फत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी व पालकांनी पाल्याचे लसीकरण करून घेण्याची गरज आहे. सध्या अभियान सुरू असून शाळा व परिसरातील रुग्णालयात डोस उपलब्ध करून दिले आहेत. धोका टाळण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.
कुलदीप मिटकरी, लसीकरण मोहीम अधिकारी जिल्हा परिषद.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.