आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाजार समितीत बटाटे, वांग्यांसह कोथिंबीरीची आवक कमी झाल्याने भाव चढे असून टोमॅटो, कोबी, हिरव्या मिरचीची आवक अधिक असल्याने भाव कमी आहेत. सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांचे बटाटे दाखल झाले आहेत. यामुळे किरकोळ बाजारात गेल्या आठवड्यापेक्षा ५ ते १० रुपयांनी बटाट्याचे दर कमी झाले. धुक्यामुळे वांग्यासह काही भाज्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे किरकोळ बाजारात काही भाज्यांच्या किमती अधिक तर काही भाज्यांच्या किमती कमी आहेत. यामुळे गृहिणींना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
अतिवृष्टी, त्यानंतर ढगाळ वातावरण, धुक्यामुळे भाजीपाल्यांचा दर्जा घसरला आहे. टोमॅटोवर डाग पडले असून वांग्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी फवारणी करून जोपासलेल्या वांग्यांना सध्या चांगला दर मिळत आहे. बटाट्याची आवक कमी असल्याने व स्थानिकचा बटाटा कमी झाल्याने दोन वर्षापासून बटाट्याचे दर ३० रुपयांपेक्षा कमी झाले नाहीत. दोन आठवड्यापूर्वी किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये किलोवर बटाटे गेले होते. कोथिंबिरीची आवकही कमी आहे. जून २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत सर्वाधिक काळ ढगाळ वातावरण राहिले होते. यामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांचे उत्पन्न कमी होत आहे. फेब्रुवारीतही थोडे धुके असल्याने रब्बी हंगामातील पिकांसह पालेभाज्या आणि फळभाज्यांचा दर्जा घसरला आहे.
यामुळे बाजारापेठेत भाव कमी मिळत आहे. जिल्ह्यात भेंडी, कोबी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, दोडका, घेवडा इतर भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सध्या शेतकऱ्यांच्या काही मालाला योग्य भाव मिळत आहे तर काही मालाची आवक अधिक असल्याने अत्यंत कमी दर मिळत आहेत. टोमॅटो उत्पादकांना मशागतीसह माल बाजार समितीत ने आण करण्याचा खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. धुक्यामुळे टोमॅटोवर काळे डाग निर्माण होत आहेत. दर्जा घसरल्याने टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या किरकोळ बाजारात टोमॅटो ७ ते १० रुपये किलोने विक्री होत आहेत.
धुक्यामुळे फवारणीचा खर्च वाढला
यंदा पावसाळा व हिवाळ्यात सर्वाधिक काळ ढगाळ वातावरण व धुक्यामुळे भाज्यांवर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत होता. शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी करावी लागत. यामध्ये शेतकऱ्यांचा पैसाही खर्च होऊनही अपेक्षित माल मिळत नाही. यामुळे बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही.
उत्पादन खर्च कमी करण्याची गरज
यंदा सतत ढगाळ वातावरण व धुके असल्याने वांग्यासह टोमॅटोवर अळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे सध्या भाव मिळत असतानाही वांग्याचे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून भाजीपाल्याची लागवड केल्यास योग्य भाव मिळेल. हंगामी भाजीपाल्याऐवजी बारमाही भाजीपाल्याला चांगला भाव मिळतो. -छत्रगुण शिंदे, शेतकरी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.