आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा रकमेच्या वसुलीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट:संपत्तीचा शोध सुरू; कैलास पाटलांच्या उपोषणानंतर हलली यंत्रणा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम 2020 मधील शेतकऱ्यांच्या हक्काच्या उर्वरित पीकविम्यासाठी 7 दिवस उपोषण केल्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरूच ठेवला असून, प्रशासनाने दिलेल्या अश्वासनानुसार बजाज अलायन्स कंपनीच्या संपत्ती जप्तीसाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांची भेट घेतली. तसेच जप्तीची कारवाई तातडीने सुरू करावी अशी मागणी केली.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी संबंधित कंपनीच्या संपत्तीची माहिती संकलित केली जात असल्याचे आमदार पाटील यांना सांगितले. विम्याचा लढा अजूनही थांबलेला नसून, त्यासाठी पाठपुरावा करत राहणार असे आमदार पाटील यांनी सांगितले.

कायदेशीर लढ्यात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्याचे आदेश दिले होते. बजाज अलायंन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुनावणी घेण्यापूर्वी जमा करून घेतलेली 201 कोटी रुपयांची भरपाई जिल्ह्यातील 3, 47, 484 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. अजूनही उर्वरित 373.25 कोटी रुपये कंपनीकडून प्राप्त होणे बाकी आहे. त्यानुषंगाने आमदार कैलास पाटील यांनी ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीवर आरआरसी (महसुली वसुली) कार्यवाही करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले होते. यावर काय कार्यवाही सुरू आहे, याचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांची पुण्यात भेट घेतली. त्यांना महसुली वसुली कार्यवाही गतिमान करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत चर्चा केली.

डॉ. राजेश देशमुख यांनी विमा कंपनीच्या संपत्तीचा शोध घेऊन तातडीने नोटिसा काढण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगत शक्य तितक्या लवकर ही कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केले आहे. पाठपुरावा करू ही आपल्यासाठी समाधानाची बाब असून, पुढेही कार्यवाही पूर्ण होऊन रक्कम हाती येईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करू,असे आमदार पाटील यांनी सांगितले. प्रसंगी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून लढाई लढू मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...