आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकंभरी नवरात्रोत्सव:तुळजापुरात शाकंभरी नवरात्रोत्सवास उद्या घटस्थापना करून होणार प्रारंभ

तुळजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मानाच्या यजमानांची सिंहासन पूजा प्रथेनुसार, यजमानपदी बळवंत कदम

तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सवास गुरुवारी (दि. २१) दुपारी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे, तत्पूर्वी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली तुळजाभवानी मातेची सिंहासन पूजा शाकंभरी नवरात्रोत्सवात प्रथेप्रमाणे सुरू असणार असल्याने पुजारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या नवरात्राची शाकंभरी पाैर्णिमेला गुरुवारी (दि. २८) दुपारी पूर्णाहुतीने सांगता होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाकंभरी नवरात्र साधेपणाने साजरा करण्यात येणार असले तरी प्रथेनुसार सर्व धार्मिक पूजा विधी होणार आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवात यजमानांच्या सिंहासन पूजेला विशेष महत्त्व असून प्रथेप्रमाणे शाकंभरी नवरात्रोत्सवात सिंहासन पूजा घालण्यास मंदिर संस्थानने परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहासन पूजेवेळी डिस्टन्सिंग, मोजकी उपस्थिती आदींचे बंधन घालण्यात आले आहे. शाकंभरी नवरात्रात सकाळी ५ तर सायंकाळी केवळ २ सिंहासन पूजा घालण्यात येणार असून त्याची तिन्ही पुजारी मंडळात विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पुजारी संख्या अधिक आणि मर्यादित सिंहासन पूजा असल्याने चिठ्ठ्या टाकून सिंहासन पूजेसाठी पुजाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमानपद भोपे पुजारी बळवंत कदम भूषवणार आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार यजमा पद भूषवण्याचा मान रोटेशन पद्धतीने तिन्ही पुजारी मंडळांना देण्यात येत आहे. या वर्षी हा मान भोपे पुजारी मंडळाकडे आहे. भोपे पुजारी मंडळाने यजमानपदी बळवंत कदम यांची निवड केली आहे. गेल्या वर्षी यजमानपद उपाध्ये मंडळाने भूषवले होते.

खर्चात १५ टक्के वाढ, ३ लाखांचा खर्च अपेक्षित
शाकंभरी नवरात्रोत्सवाचा संपूर्ण खर्च यजमानाला करावा लागतो. गतवर्षी २ लाख ७० हजार रुपये एवढा खर्च झाला होता, तर या वर्षी १५ टक्के वाढ गृहीत धरून ३ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये अन्नदान, महाप्रसादाला सर्वाधिक खर्च असून ब्रह्मवृंद वर्णी, पूजा साहित्य आदींसाठी खर्च होतो. नवरात्रापूर्वी खर्चाचा धनादेश मंदिर संस्थानकडे सोपवणे बंधनकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...