आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पाचवतील १७२२ तर आठवीतील ५७१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याचा अत्यंत कमी निकाल आहे. काही मोजक्याच शाळा वगळता अन्य शाळांमध्ये शिष्यवृत्ती परिक्षेच्या तयारीकडे दुर्लक्ष होत असते. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याला उत्तुंग भरारी मारता आलेली नाही.
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहिर करण्यात आला. पूर्व प्राथमिक परिक्षेसाठी जिल्ह्यातील पाचवी वर्गातील ८७६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८२५७ विद्यार्थी परिक्षेसाठी उपस्थित राहिले तर ५१२ विद्यार्थ्यांनी परिक्षेला दांडी मारली होती. यापैकी १७२२ विद्यार्थी पात्र म्हणजे यशस्वी ठरले असून उर्वरित ६५३५ विद्यार्थ्यांना यश मिळवता आले नाही. जिल्ह्याचा २०.८० टक्के निकाल लागला आहे.
पूर्व माध्यमिक परिक्षेसाठी आठवीचे विद्यार्थी बसू शकतात. असे जिल्ह्यातून ६३७८ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ५९९९ विद्यार्थ्यांनी परिक्षेला उपस्थिती दर्शवली तर ३७९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते. यापैकी ५७१ विद्यार्थ्यांना यश संपादन करता आले आहे. ५४२८ विद्यार्थ्यांना यश मिळवता आले नाही. या विभागाचा निकाल ९.५२ टक्केच लागला आहे. विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन अनेक शाळांनी यावर्षी चांगली तयारी करून घेतली होती.
जिल्हास्तरावरूनही मार्गदर्शन नाही जिल्हास्तरावरूनही शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परिक्षेसाठी तयारी करण्यासाठी शाळांना मार्गदर्शन करण्यात येत नाही. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डायटकडेही याचा विशेष कार्यक्रम नाही. अशा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती कमी प्रमाणात मिळत असली तरी मोठ्या स्पर्धा परिक्षांच्या दृष्टीने ही परिक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे अशा परिक्षांकडे शिक्षण व डायट विभागाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
अनेक शाळांचे दुर्लक्ष अनेक शाळांचे शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी करण्याकडे दुर्लक्ष असते. केवळ विद्यार्थ्यांचे परिक्षा फॉर्म भरण्यापुरतीच जबाबदारी शाळा घेत असतात. प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकडे मोठे दुर्लक्ष होते. अधिक तासिका घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याची गरज असते. मात्र, शाळांकडून असे होताना दिसत नाही. परिणामी अशा शाळांमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या निकालावर परिणाम झाला आहे.
अन्य जिल्ह्याच्या तुलनेत कमीच यश, कोल्हापूर जिल्हा ठरला सरस पूर्व माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेच्या दोन्ही विभागातून कोल्हापूर जिल्हा पुन्हा सरस ठरला आहे. अन्य जिल्ह्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असली तरी तितक्याच अधिक प्रमाणात अन्य जिल्ह्यांनी चांगले यश मिळवले आहे. मात्र, पाचवीच्या परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याचा १९ तर आठवीच्या परिक्षेत २१ क्रमांक आला आहे. यावरून जिल्ह्याने किती सुमार दर्जाची कामगिरी शिष्यवृत्ती परिक्षेत केली आहे, हे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.