आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विकासासाठी पंढरीच्या काॅरिडाॅरचीही पथकाने घेतली माहिती

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या पथकाने पंढरपूर काॅरिडाॅरची मंगळवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत माहिती घेतली. यावेळी पंढरपूर काॅरिडाॅरमध्ये संपादित करण्यात येणारी जागा, जागा मालकांना द्यावयाचा मावेजा, रस्ते रुंदीकरण, पायाभूत सुविधा यासह उपलब्ध होणाऱ्या सेवा आदींची सविस्तर माहिती घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत पंढरपूर काॅरिडाॅरचे व्हिडीओ सादरीकरणही करण्यात आले.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डाॅ. सचिन ओंबासे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, मुख्याधिकारी अरविंद नातु, सोलापूरचे डिपीओ आशिष लोकरे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, उपविभागीय अधिकारी, अक्कलकोट पालिकेचे मुख्याधिकारी, सोलापूरचे जिल्हा नियोजन अधिकारी व इतर उपस्थित होते.

यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिराला भेट तुळजापूरचा विकास आराखडा तयार करताना उच्च दर्जाची कामे आणि भाविकांना सुविधा मिळण्यासह स्थानिक रहिवासी आणि प्रशासनाला कोणताही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर संस्थानचे पथक तीर्थक्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती संकलित करत आहेत. त्यानुसार यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. दोन दिवसांच्या भेटीत तिरुपती बालाजी देवस्थानच्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती घेतली. आज पंढरपूरची माहिती घेतली. त्यानंतर आता हे पथक लवकरच वाराणसीला भेट देणार आहेत.

विकासासाठी जिल्हाधिकारी डाॅ. ओंबासे आग्रही भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओंबासे आग्रही आहेत. तुळजाभवानी मंदिर व शहर विकासासाठी डाॅ. ओंबासे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे पाहणी दौऱ्यासह बैठका घेऊन नियमित आढावा घेण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...