आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुमारे साडेचार वर्षापूर्वी चार कोटी रूपये मंजूर झालेल्या नवीन रेल्वे स्टेशन रोडची दुरवस्था कायम आहे. निधी मंजूर झाला तरी कामाला सुरूवात होत नसल्याने नागरिकांचे मात्र प्रचंड हाल सुरू आहेत. रस्त्याला अडथळा ठरणारे विजेचे १३ खांब एका बाजुला शिफ्ट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या काही महिन्यात अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला.
मात्र, पालिका म्हणते हे काम बांधकाम विभागाचेच असून, त्याआधी भुयारी गटारच्या कामांसाठी विभागाने लेव्हल काढून द्यावी, यासाठीच आमचा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, या दाेन्ही विभागांच्या गोंधळात नागरिकांचे हाल सुरू आहेत. नवीन रेल्वे स्टेशन मार्गासाठी शरद पवार हायस्कूल ते सनराईज स्कूलपर्यंत सिमेंट व डांबरीकरणासाठी चार वर्षांपूर्वीच निधी मंजूर झाला होता.
निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. शरद पवार हायस्कूलपासून १.२ किलोमीटर काँक्रिटीकरण आणि त्यापुढे ११०० मीटर डांबरीकरण होणार आहे. मात्र, रस्त्यावर येणारे विजेचे १३ खांब काढल्याशिवाय काम करता येणार नाही, हे खांब पालिकेने काढून एका बाजुला बसवावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी मधोमध येणारे खांब अडचणीचे ठरत आहेत. पालिकेने मात्र हे काम आमचे नाहीच, बांधकाम विभागानेच खांब शिफ्ट करावेत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे हे खांब हलवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न आहे.
नागरिकांमध्ये संताप
नवीन रेल्वे स्टेशन रोड परिसर झपाट्याने विस्तारत आहे. या भागात नवीन वसाहत वाढत असल्याने लोकसंख्येत भर पडत आहे. मात्र,नवीन रेल्वे स्टेशन हा एकमेव रस्ता या भागातील नागरिकांसाठी असल्याने व रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे, यासाठी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर निधी मंजूर झाला, मात्र कोरोनात विकास निधीला कात्री लागल्याने कामाला गती येत नव्हती.
खांब शिफ्टिंग ही बांधकाम विभागाचीच जबाबदारी
खांब शिफ्टिंगचे काम बांधकाम विभागाचे आहे. हा रस्ता त्या विभागाकडे असल्याने खांब काढण्याचे काम त्यांनाच करावे लागेल. तशी कल्पना बांधकाम विभागाला दिली आहे. या रस्त्यावर भुयारी गटार योजनेचे काम करायचे असल्याने त्यांना आम्ही लेव्हल काढून द्यावी, असे सूचवले आहे. त्यासाठी विलंब लागत आहे.- वसुधा फड, मुख्याधिकारी, नगरपरिषद, उस्मानाबाद
नागरिकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार
नवीन रेल्वे स्टेशन रोडवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिका व बांधकाम विभागाच्या वादात काम रखडले. पावसाळ्यात शिक्षक कॉलनी, रामकृष्ण कॉलनी भागातून स्टेशन रस्त्यावर पाणी येत असल्याने प्रवास करणे अशक्य होते. आता या कामासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. - राेहित बागल, मराठवाडा उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.