आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या धाराशिव ते उजनी या ३५ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात दिरंगाई होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. बेंबळीपर्यंत डांबरीकरण केल्यानंतर उजनी रस्त्यावरील खडी टाकण्याचे काम पूर्ण केले जात आहे. तसेच रुईभरजवळ खोदकाम करून दीड महिना झाला तरी येथे डांबरीकरणाचा अद्याप पत्ता नाही. हायब्रिड अन्युटींतर्गत १०४ कोटींच्या निधीतून धाराशिव ते उजनी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. ३५ किमी रस्त्याचे दुपदरीकरण कामाला सुरुवात होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी होऊनही काम पूर्ण झाले नाही.
अगोदरचे तीन वर्ष तर हा रस्ता जागोजागी खोदून ठेवला होता. नंतर लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने कसेबसे बेंबळीपर्यंतचे डांबरीकरण केले. डांबरीकरण करून सहा महिने झाले आहेत. मात्र, बेंबळीपासून उजनीपर्यंतच्या रस्त्याचे अद्यापही खोदकाम व खडीकाम सुरू आहे. हे काम मंद गतीने सुरू असून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. बेंबळीपर्यंत चांगला प्रवास झाला तर पुढे उजनीपर्यंत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उजनी रस्त्यावर अनेक ठिकाणी खडीचे ढिग टाकले आहेत. अनेक ठिकाणी खडी विखरून पडली आहे. यामुळे दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनेही घसरून पडत आहेत. अनेक प्रवासी सातत्याने जखमी होत आहेत.
बेंबळीचा प्रवास पुन्हा खडतर
रुईभर परिसरात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. रस्ता खोदून दीड महिना होत अाला तरी डांबरीकरणासाठी मुहूर्त मिळालेला नाही. येथे खोदकामाच्या अगोदरच चांगला रस्ता होता. हाच रस्ता खोदला आहे. यामुळे बेंबळीपर्यंत तरी सुखकर होत असलेल्या प्रवास पुन्हा खडतर झाला आहे. येथेही खडीचे मोठे ढिग टाकण्यात आले आहेत.
एप्रिलपर्यंत काम पूर्ण करणार
होळीमुळे इतके दिवस काम बंद होते. आता काम वेगाने करून एप्रिलपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. लवकरच डांबरीकरणही करण्यात येणार आहे. -आदित्य बुरूड, कंत्राटदार प्रतिनिधी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.