आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही टळणार गुरुजींचा सन्मान:शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवूनही पुढील प्रक्रियाच नाही ; शिक्षक दिन नावालाच

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सर्वाेत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होण्यासाठी शिक्षक दिनादिवशी जिल्हास्तरीय पुरस्कार देण्याचा शिरस्ता आहे. मात्र, यावर्षीही गुरुजींचा सन्मान जिल्हा परिषदेकडून टळणार असल्याचे दिसत आहे. यासाठी प्रस्ताव मागवण्यात आलेले असतानाही पुढील काहीच प्रक्रिया करण्यात आलेली नाही. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

शिक्षकांचा सन्मान व्हावा, यासाठी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. यासाठी शासनाने सर्वाेत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुसार राज्य व अन्य पुरस्कार नित्यनियमाने देण्यात येत आहेत. परंतु, जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक अशा प्रत्येक तालुक्यातुन दोन तसेच एका विशेष शिक्षकाला पुरस्कार देण्यात येतो. परंतु, यावर्षीही जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे या महत्त्वाच्या उपक्रमाकडे दुर्लक्ष झाले आहे. शिक्षण विभागाने यासाठी आगस्टच्या पहिल्या आठवड्यातच पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले हाेते. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून असे प्रस्ताव पाठवण्यातही आले. परंतु, पुढील प्रक्रियाच होऊ शकली नाही. यामुळे यावर्षीही पुरस्कार देण्याचे टळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद व शिक्षण विभागाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांना विचारण्यासाठी संपर्काचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता.

शिक्षक दिन नावालाच
गेल्या काही वर्षांपासून शिक्षक दिनाला पुरस्कार वितरण टळतच आहे. प्रशासनाच्या आळशीपणामुळे शिक्षकांचा हक्कच हिरावला गेला आहे. दरवर्षी मोठी चर्चा होते. मात्र, ऐनवेळी कार्यक्रमच होत नाही. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे मत प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी व्यक्त केले. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यासाठी प्रशासन अग्रेसर असते. मात्र, हक्काचा पुरस्कार देण्यासाठी का टाळले जाते, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष कल्याण बेताळे यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...