आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्यकीय महाविद्यालयाकडे जिल्हा रुग्णालय वर्ग करून सहा महिने झाले तरीही अद्याप लेखाशीर्ष तयार करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. यामुळे औषध खरेदीला अडथळा येत असून औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. तसेच उसनवारीत आरोग्य विभाग औषध देण्यास तयार असताना महाविद्यालय वैध प्रक्रिया करून घेण्यासही तयार नाही. असाच प्रकार ऑक्सिजन, सुरक्षा, उपकरणांच्या बाबतीत आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी गुरूवारी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर तेथे औषधांचा तुटवडा असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यांनी स्वत: औषधांची चिठ्ठी घेऊन खिडकीत मागणी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. यामुळे संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडाली. दरम्यान, असा गोंधळ उडाल्यामुळे अनेक बाबी समोर आल्या आहेत. औषधांचा तुटवडा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.
जिल्हा रुग्णालय तीन वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन वर्षाने सामंजस्य कराराने देण्यात आले आहे. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांच्या अधिनस्थ सर्व अधिकाऱ्यांचे नियंत्रण नियमानुसार काढण्यात आले आहे. यामुळे सर्वाधिकार आता महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडे आले आहेत. या सर्व बाबी करत असताना वैद्यकीय महाविद्यालयाला निधी उपलब्ध करण्यासाठी लेखाशिर्षच तयार करण्यात आलेले नाही.
यामुळे औषध खरेदी करण्याचे अधिकार अद्यापही अधिष्ठात्यांना प्राप्त झालेले नाहीत. परिणामी आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त आलेल्या रुग्णालयाला औषधांचा तुटवडा जाणवत आहे. बीपी, शुगर, लहान मुलांची औषधे, डोळ्यात टाकण्याची औषधे अशा अनेक औषधांचा तुटवडा आहे. लेखाशिर्ष तयार झाल्याशिवाय याला कायमस्वरुपी मार्ग निघू शकणार नाही. यामुळे आता लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन तातडीने राज्य व केंद्र सरकारकडे ही प्रक्रिया करण्याची गरज आहे.
ऑक्सिजनचाही तुटवडा
रुग्णालयातही सध्या ऑक्सिजनवर मोठ्याप्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन सिलिंडर किंवा तत्सम साहित्य खरेदीसाठीही लेखाशिर्ष नसल्यामुळे अधिष्ठाता खरेदी करू शकत नाहीत. परिणामी गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑक्सिजन संपण्याची वेळ आली होती. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी यंत्रणा राबवून तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. अशीच परिस्थिती आता सुरक्षा व्यवस्था, जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीत आहे. नियोजन समितीचाही निधी अधिष्ठातांना घेता येत नाही.
उसनवारीचा पर्याय, पण प्रक्रिया नाही
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिनस्त असलेल्या सर्व उपजिल्हा व अन्य रुग्णालयांमध्ये आगामी तीन महिन्यांपर्यंत इतका औषध साठा शिल्लक आहे. उसनवारीवर हा साठा अधिष्ठातांना देता येऊ शकतो. मात्र, यासाठी अधिष्ठातांकडून योग्य मागणी जाणे आवश्यक आहे. यासाठी विशिष्ठ प्रक्रिया करावी लागते. अशी प्रक्रियाच होत नसल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक औषध देऊ शकत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.