आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येत आहे. परंतु, आधार प्रमाणीकरण करूनही दोन हजार १५२ शेतकऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान वितरण करण्यात आले नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील माहिती चुकलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. असे शेतकरी सातत्याने बँकेत व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात फेऱ्या मारून थकून गेले आहेत. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर लाभ योजनेचे जिल्ह्यात अद्यापही भिजत घोंगडे आहे. यामुळे शेतकरी आता वैतागून जात आहेत. एकतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना कर्जमाफी योजनेतून वगळले होते.
शेतकरी उसनवारी करून किंवा सावकारांकडे दागिना गहाण ठेवून पीककर्जाची परतफेड करून नूतनीकरण करत असतो. त्यात फडणवीस सरकारने त्यांना चांगला लाभ दिला नाही. यामुळे नियमित नूतनीकरण करून आम्ही पाप केले का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते. नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे जाहीर केले होते. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर कशीबशी रक्कम मिळू लागली. जिल्ह्यातील २१५२ शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करूनही रक्कम खात्यावर पडत नाही. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून पाच महिने झाले. त्यांची माहितीच बँकेकडून चुकीची भरली होती. यामुळे त्यांचे अनुदान रखडले. यात जिल्हा बँकेचे खातेदार अधिक असून प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अशक्य झाले .
आतापर्यंत ३९०८८ शेतकऱ्यांना ११५.७२ कोटींचे वितरण
आतापर्यंत जिल्ह्यातील ३९ हजार ८८ शेतकऱ्यांना टप्प्याने ११५ कोटी ७२ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. ही रक्कम सहा टप्प्यात देण्यात आली. पूर्वी १०१ कोटी वितरीत झाल्यानंतर नंतर रक्कम देण्यात आली नव्हती. यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले होते. गत महिन्यात ३३६५ शेतकऱ्यांची नवीन यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्यातील व पूर्वीच्या उरलेल्या पाच हजार शेतकऱ्यांना १४ कोटी रुपये वितरीत झाले आहेत. मात्र, अद्यापही दोन हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत.
फेऱ्या मारून थकलो
जिल्हा बँक व डीडीआर ऑफिसमध्ये फेऱ्या मारून थकलो तरी अनुदान मिळत नाही. नेमके अनुदान कोठे गेले ? शेतकऱ्यांना हे का दिले जात नाही ? याबाबत आता संशय वाढत आहे. तातडीने रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. -भारत पाटील, शेतकरी संघटना.
मार्चमध्ये मिळेल रक्कम
ज्यांची माहिती चुकली होती, अशा शेतकऱ्यांची माहिती पुन्हा एकदा ऑनलाइन प्रणालीतून शासनाकडे पाठवण्यात आली आहे. यासाठी झालेल्या बैठकीत मार्चमध्ये रक्कम देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.- सुनिल शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.