आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘लोकमंगल’च्या विरोधात उद्या आंदोलन होणार ; शेतकऱ्यांचा आंदोलनास पाठिंबा

लोहारा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकरी शुक्रवारी (दि.११) लोकमंगल कारखान्याविरोधात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीने पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांनी बुधवारी (दि.९) लोहारा तहसीलदारांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, उमरगा व लोहारा परिसरातील काही वर्षापासून अतिरिक्त उसाच्या प्रश्नाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी प्रति शेअर्स २५ हजार रुपये प्रमाणे खरेदी करून लोकमंगल माऊली शुगर लिमिटेड लोहारा कारखाना उभा केला. तसेच खेड व लोहारा परिसरातील शेतकऱ्याने आपली जमीन कारखान्यासाठी कवडीमोल भावाने परिसरातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील व आपल्या मुलाबाळांना रोजगार उपलब्ध होईल या उदात्त हेतूने कारखान्यास जमिनी व भाग भांडवल उपलब्ध करून दिले.

परंतु, सद्यस्थितीचा विचार केले असता कारखाना प्रशासनाकडून मूळ हेतू बाजूला सारून नफेखोरीचा गोरख धंदा चालल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी कारखाना प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे वैफल्यग्रस्त होऊन आंदोलनाच्या भूमिकेत उभे राहत आहेत. लोकांच्या जनभावनेचा विचार करून कारखाना प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये २०२१- २२ उस गळीत हंगामाचा अंतिम दर परिसरातील इतर कारखान्याप्रमाणे देण्यात यावा, २०२२- २३ ची चालू गळीत हंगामाची पहिली अनामत उचल देण्यात यावी, उसाच्या वजन काट्यातील गैरसमज जाहीरपणे दूर करण्यात यावेत, कारखान्याची रिकव्हरी तपासणी यंत्रणा साखर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणामध्ये ठेवण्यात यावी., कारखान्याच्या समोरून जाणारा लोहारा ते माकणी रस्त्यावरील वाहनचालकांना आपल्या कारखान्याच्या बगॅसच्या धुळीचा व कचऱ्याचा प्रचंड त्रास होत असून प्रतिबंधात्मक उपाय करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

भूकंपग्रस्त कृती समितीचा पाठिंबा होळी परिसरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीचा जाहीर पाठिंबा असून सदरील आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, उपाध्यक्ष सुनील साळुंके, कार्याध्यक्ष सतीश मनाळे यांच्यासह सलमान सवार, महेश स्वामी, सचिन रणखांब, बालाजी मातोळे आदी उपस्थित होते. धुळीमुळे रस्त्यावरून वाहनचालकांना वाहने चालविणे तसेच पादचाऱ्यांनीही चालणे कठीण बनले असल्याचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...