आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:उस वाहतूक करणाऱ्या चालकांवर चोरट्यांचे लक्ष ; चार घटना झाल्याने घबराट

वाशी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरून उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना चोरटे लक्ष्य करत जात असून मारहाण करून लूट केली जात आहे. दहा दिवसांत अशा प्रकारच्या चार घटना घडल्या असून याबाबत धाराशिव साखर कारखान्याने वाशी पोलिस ठाण्याकडे उस वाहतूक करणाऱ्या चालकाला अडवून मारहाण करत लूट करण्याच्या घटना रोखण्याबाबत पत्र दिले आहे.

वाशी तालुक्यात पारगाव ते तेरखेडा या दरम्यान ३० किमीचा राष्ट्रीय महामार्ग येत असून कमी वेगात चालणाऱ्या ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांना अडवून चालकाला मारहाण करण्याचे प्रकार चोरटे करत असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी (दि.१२) महामार्गावरील कन्हेरी पाटी नजीक असलेल्या चढाच्या रस्त्यावर रात्री एका ट्रॅक्टरला अडवत चालकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चालकाच्या हाताची दोन बोटे मारहाणीत तुटली आहेत. यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

याबाबत धाराशिव साखर कारखान्याने वाशी पोलिसांना कारवाई करण्याबाबत विनंती पत्र दिले आहे. वाशी, भूम तालुका, पारगाव, ईट यासह बीड जिल्ह्यातून या कारखान्याला ऊस येत आहे. मात्र, चोरट्यांकडून वाहन अडवून चालकास मारहाण करून डिझेल, रोख रक्कम, मोबाईल व इतर वाहनातील वस्तू चोरल्या जात आहेत. पाेलिस प्रशासनाने महामार्गावर रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चोरटयांना पकडण्यासाठी या मार्गावर गस्त घालण्यासह खबऱ्यांना सक्रीय करणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. चालू हंगामात जर हा प्रश्न सोडविला नाहीतर पुढील हंगामातही चोरटे धुमाकूळ घालतील अशी भिती आहे.

रात्रीची गस्त वाढविली राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून चालकाला मारहाण करण्याचे प्रकार थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून रात्री महामार्गावर नियमित गस्त असते. मात्र, सध्या उसाच्या वाहनांवरही चोरट्यांनी लक्ष केले असून काही घटना घडल्या आहेत. यामुळे रात्रीची गस्त वाढवण्यात येईल. चालकांनीही पोलिसांच्या संपर्कात राहून चोरट्यांची माहिती द्यावी. सुरेश बुधवंत, पोलिस निरीक्षक, वाशी.

बातम्या आणखी आहेत...