आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी भारतीय कृषी विमा कंपनीने दोन दिवसांत पहिल्या टप्प्यातील २५४ कोटी रुपये नुकसान भरपाई वितरित केली आहे. मात्र, नुकसान भरपाईच्या रकमेतील तफावतीबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेकांना नुकसानीच्या प्रमाणात अत्यल्प विमा मिळाला आहे.ज्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत कमी विमा मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करून पंचनाम्याच्या प्रमाणित प्रती काढून घ्याव्यात, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, पीक विमा हा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ऑनलाइन सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या, त्या सूचनांच्या अनुषंगाने करण्यात आलेले पंचनामे व यामध्ये दाखविण्यात आलेले नुकसान याप्रमाणे विमा वितरित करण्यात आला आहे.
पुढील टप्प्यात काढणी पश्चात नुकसानीच्या प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने झालेले पंचनामे व पीक कापणी प्रयोग यातून निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी अनुज्ञेय विमा वितरित केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समक्ष पंचनामे करून त्यावर त्यांची स्वाक्षरी अपेक्षित आहे. क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी एकसारखीच असतानाही बाधित क्षेत्र कमी जास्त दाखवल्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये तफावतीची प्रकरणे समोर आली आहेत. अगदी १५०० रूपये प्रति हेक्टरीपासून १७००० रूपये प्रतिहेक्टरीपर्यंत नुकसान भरपाई रकमेमध्ये तफावत आहे. काढणी पश्चात नुकसानीच्या ऑनलाइन सूचना केलेल्या शेतकऱ्यांना या टप्प्यात नुकसान भरपाई अदा करण्यात आली नाही तसेच पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी अनुद्येय पीक विम्याबाबत कार्यवाही सुरू असून, लवकरात लवकर ही नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.