आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कराची आकारणी:करापाेटी सुविधा मागणाऱ्या नागरिकाला नळ कनेक्शन तोडण्याची धमकी

वाशी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रत्येक भागात मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याचे काम नगरपंचायतीचे आहे. मात्र, प्रत्यक्ष नगरपंचायतीकडून कोणतीही सुविधा पुरवली जात नाही. असे असताना घरपट्टी, नळपट्टीसह विविध कराची आकारणी केली जाते. याचा जाब नागरिकांनी विचारल्यास त्यांना नळ कनेक्शन तोडण्याची धमकी मुजोर कर्मचाऱ्यांकडून दिली जाते. असाच प्रकार बुधवारी (दि.२) नगरपंचायतीत घडला असून प्रभाग क्र. ३ मधील नागरिक कवडे यांना कर्मचाऱ्यांनी नळ कनेक्शन तोडण्याची धमकी दिली आहे.

वाशी शहरातील मधुकर कवडे यांच्याकडे नगरपंचायतीकडून आकारण्यात आलेल्या कराची बाकी होती. त्यामुळे कवडे यांना कर भरण्याबाबत नगरपंचायतीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. आकारण्यात आलेल्या कराचा भरणा करण्यासाठी कवडे यांचा मुलगा रवींद्र बुधवारी (दि.२) नगरपंचायतमध्ये गेले होते. त्यावेळी कर भरण्याची पावती करताना त्यांना त्यामध्ये ५०० रुपये आरोग्य कर आकारण्यात आला होता. हे रवींद्र यांच्या निदर्शनास आले. यामुळे रवींद्र यांनी संबंधित कर निर्धारक असलेले कर्मचारी जगदीश सोंडगे यांना विचारणा केली व मी ज्या भागात वास्तव्य करत आहे त्या भागात सुविधांचा अभाव आहे. असे असताना आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या उपाययोजनांचा कर का भरावा? किमान जे कर आकारण्यात येत आहेत, त्या बदल्यात तुम्ही सुविधा का देत नाहीत. माझ्या प्रभागात ये - जा करण्यासाठी रस्ता नाही. जागोजागी रस्ता व रस्त्याच्या बाजूला पाणी साठले जाते. तरीही आम्ही कराचा भरणा करत आहोत. करापोटी जर सुविधा मिळत नसतील तर मी त्या सुविधांपोटी का कर भरावा, अशी विचारणा केली.

त्यावेळी संबंधित नागरिकांच्या प्रभागात सुविधा मिळत नसल्याने लवकर सुविधा पुरवण्यात येतील अशी समजूत काढण्याऐवजी कर निर्धारक जगदीश सोंडगे यांनी मुजोरपणाने उत्तर देत उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना यांचे नळ कनेक्शन बंद करा अन्यथा त्यांच्याकडून कर भरणा करून घ्या. कीर्तन ऐकायला बसलो नाही असे उद्धट उत्तर दिले. यामुळे नागरिकांना काहीच किंमत नाही का? ज्यांच्या करातून नगरपंचायतला उत्पन्न मिळते त्यांना अशा धमक्या दिल्या जात असतील तर नागरी सुविधा मागायच्या नाहीत काय? असा प्रश्न नागरिकांत उपस्थित हाेत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत कर निर्धारक जगदीश सोंडगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीने संपर्क साधला असता उद्धटपणे आपण कोण? जे असेल ते कार्यालयात येऊन बोल म्हणत फोन कट केला.

रीतसर अर्ज करा कर आकारणी राज्य शासनाकडून होते. कर भरला नाही तर कारवाईची तरतूद आहे. काही तक्रार असेल तर रीतसर अर्ज करावा. तक्रारीचा निपटारा केला जाईल. गिरीश पंडित, मुख्याधिकारी, वाशी.

बातम्या आणखी आहेत...