आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअगोदर बियाणेच न उगवल्यामुळे व नंतर अतिवृष्टीत पीक वाहून गेल्यामुळे २०२० मध्ये सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला होता. मात्र, ऑनलाइन प्रक्रिया न करणे, ७२ तासांच्या आता माहिती सादर न करणे आदी कारणांमुळे जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीकविमा नाकारणाऱ्या विमा कंपनीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिला आहे. सर्व शेतकऱ्यांना सहा आठवड्याच्या आता विम्याची रक्कम द्यावी, कंपनीने रक्कम न दिल्यास राज्य सरकारने भरपाई देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. यासाठी “दिव्य मराठी’ने पाठपुरावा करून नेत्यांना याचिका दाखल करण्यास भाग पाडले होते.
गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० च्या खरीप हंगामाता शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. नंतर मात्र, सुरुवातीला बीयाणेच न उगवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून सोयाबीन पेरले होते. मात्र, ऐन सोयाबीन काढणीला आले असतानाच सप्टेंबर २०२० च्या दरम्यान अतिवृष्टीचा तडाखा जिल्ह्याला बसला होता. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात शेततळेच निर्माण झाले होते.
तब्बल १० ते १५ दिवस पिक पाण्यात होते. शेतकऱ्यांना पिक काढणे तर दुरच शेतात जाणेही अशक्य झाले होते. वीजपुरवठा बंद पडला होता. यामुळे मोबाईल चार्ज नव्हते. असे असतानाही कुठेही तरतुद नसताना पिकविमा कंपनीने ऑनलाईन तक्रार करण्याचा आग्रह धरला होता. हा आग्रह किती अनाठायी होता, यासंदर्भात “दिव्य मराठी’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.
अखेर याच मुद्द्यावर विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा नाकारला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काहींजणांनी ऑनलाईन केले होते, त्यांना विमा देण्यात आला. परंतु, ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांना विमा नाकारण्यात आला. यासंदर्भात आक्रोश मांडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर अखेर शुक्रवारी निकाल दिला. यामध्ये सुमारे ५१० कोटी रुपये विमा रक्कम वंचित शेतकऱ्यांना सहा आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत. कंपनीने आदेश न पाळल्यास त्यानंतर राज्य सरकारने भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
पीकविमा मंजूर झाल्याचा तेरमध्येही जल्लोष
तेर । उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना खरीप-२०२० चा पीकविमा उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. याबद्दल तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी पेढे वाटण्यात आले. कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.