आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईची गरज:चायनिज खाल्ल्यामुळे तिघांना विषबाधा, रुग्णालयात उपचार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील परिसरातील एका चायनिज खाद्यपदार्थ विक्री दुकानात चायनिज राईस खाल्ल्यानंतर एका युवतीसह तिघांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील वरुडा येथील रुपेश विकास गंगावणे, देवळाली येथील अमिता गायकवाड व विपूल गायकवाड मध्यवर्ती इमारती परिसरातील एका चायनिज स्टॉलवर सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गेले होते. तेथे त्यांनी चिकन राईस नावाचा चायनिज पदार्थ खाल्ला. काही वेळाने ते आपापल्या घरी परतले. तेव्हा त्यांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. काही वेळाने रुपेश याला पाच वेळा उलट्या झाल्या.

अमिता व विपूल यांनाही तीन-चार वेळा उलट्या झाल्या. गावातील एका डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी उस्मानाबादला जाण्यास सांगितले. उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी तातडीने अॅडमिट करून घेतले. तसेच उपचारही सुरू केले. त्यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणात राहण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.

‘एफडीए’कडून हवी कारवाई शहरात चायनिज व अन्य खाद्यपदार्थ विक्रीचे दुकाने चालवण्यात येत आहेत. अनेकजण ताजे पदार्थ विकतात. मात्र, काहीजण शिळे अन्न पदार्थ ठेवतात. परिसर अत्यंत अस्वच्छ ठेवतात. काही हॉटेल, खानावळीतही असा प्रकार असतो. यामुळे आता अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...