आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र, राज्य सरकारचा वेळकाढूपणा; ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांची माहिती

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र व राज्यातील सरकार वेळकाढूपणा करत आहे. यामुळे ५ एप्रिल ते १७ मे या काळात महाराष्ट्रभर ओबीसी संघर्ष रथयात्रा काढून समाजात जनजागृती करण्यात येणार आहे, याची सुरुवात मंगळवारी सकाळी तुळजापूर येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन करण्यात येईल, अशी माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली. यात्रेची माहिती देण्यासाठी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बारसकर यांनी माहिती दिली. यावेळी महादेव माळी, खलील सय्यद, विशाल शिंगाडे, लक्ष्मण माने, डी. एन. कोळी, रवी कोरे आदींची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना बारसकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींना ४५ वर्षे आरक्षणासाठी वाट पहावी लागली. आरक्षण मिळून २५ वर्ष झाली नाहीत तोच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण काढून घेतले आहे. ओबीसी समाज गप्प राहिला तर यापुढील काळात शैक्षणिक आणि नोकर्‍यांमधील आरक्षण काढून घेतले जाईल. देशात ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षणासह इतर सुविधा देण्याची शिफारस बी.पी. मंडल आयोगाने केलेली होती. आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ३१ याचिका दाखल झाल्या. त्या निकाली निघण्यासाठी १९९२ साल उजाडले. इतक्या प्रयासाने मिळालेले आरक्षण केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हिसकावले जात आहे. म्हणून ओबीसी आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर ते आझाद मैदान ओबीसी संघर्ष रथयात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. आझाद मैदानातून मोर्चा काढला जाणार आहे. रथयात्रेत महाराष्ट्रातून ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...