आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाअभावी चौक कोंडले:भूममध्ये मुख्य रस्त्यांवर बेशिस्त पार्किंगने वाहतूक कोंडी; वाहने चालवणे मुश्किल

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य रस्त्याला वाहनांच्या बेशिस्त पार्किंगचा विळखा पडला आहे. तसेच व्यावसायिकांच्या दुकानांसमोर लावलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते अडवले जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रोडवरुन चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालवणाऱ्यांना तारेवरची कसरत करुन वाहन बाहेर काढावे लागत आहे. शहरातील चौका-चौकात हॉटेल, दुकानासमोर रोडवर वाहने बेशिस्तपणे लावण्यात येत आहेत. यामुळे शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.

यामुळे शहरातील नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. शहरातील बसस्थानकासमोर नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची खुलेआम पार्किंग करण्यात येत आहे. दुसऱ्या वाहनचालकांना अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने ही वाहने लावण्यात येत आहेत. बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील प्रमुख रोडवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

शहरातील आठवडी बाजार प्रत्येक गुरुवारी असल्याने या दिवशी बेशिस्त पार्किंगचा कळस होतो. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहरात वाहतूक कोंडीसह सुसाट दुचाकी चालक, कर्णकर्कश हॉर्नच्या वाहनांवरही पोलिसांनी जरब बसवणे गरजेचे आहे.

दक्षता घेत पार्किंग करावी
शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहने पार्किंग करताना रोडवर अस्ताव्यस्त लावू नये. दुसऱ्यांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घेऊनच वाहनांची पार्किंग करावी. - अनिल शेंडगे, नागरिक, भूम.

या चौकांमध्ये वाहतूक कोंडी
बसस्थानकासमोर गोलाई चौकासह ओंकार चौक, फ्लोरा चौक, नागोबा मंदिर चौक, नगरपरिषद परिसर, नगर रोड, कॉलेज रोड, परंडा रोड, वेताळ रोड, परंडा रोडवरील एसबीआय बँकेसमोर बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...