आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीकडुन पाठपुरावा:घरांचे हस्तांतरण, वारसाला प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली, भूकंपग्रस्तांना दिलासा

लोहारा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना घरांचे हस्तांतरण करण्यासाठी परवानगी मिळावी व मूळ लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास वारसाला भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणी भूकंपग्रस्त भागातील शिष्टमंडळाने तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली होती. दरम्यान, भूकंपग्रस्तांना बांधून दिलेल्या पुनर्वसित घरांचे वारसा हक्काने हस्तांतरण, भूकंपग्रस्त लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर त्याचा कायदेशीर वारसाच्या नावे वारसा हक्क नोंद करणे, घर खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षीसपत्र करण्याचे अधिकार मूळ मालक किंवा त्यांच्या वारसास देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढले आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांना २०१७ मधील आदेशान्वये मिळालेला न्याय २०२२ च्या अखेरीस लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांना मिळाला आहे.

भूकंपग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार यांचा प्रशासन स्तरावर अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. १९९३ मध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर लोहारा व उमरगा तालुक्यातील अ व ब वर्गवारी असलेल्या गावांना महाराष्ट्र शासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने घरे बांधून दिली होती. उमरगा तालुक्यातील अ वर्गवारीचे १० गावे व ब वर्गवारीमध्ये ९ गावे तसेच लोहारा तालुक्यात अ वर्गवारीत १६ तर ब वर्गवारीत ३ गावे, असे उमरगा व लोहारा तालुक्यात एकूण ३८ गावे आहेत. दोन्ही तालुक्यातील अ व ब वर्गवारीतील २०४६० घरांचे वाटप केले.

या घरांसंदर्भात हस्तांतरण वाटणी करण्यास प्रतिबंध असल्याने अनेक अडचणी येत होत्या. घरांची विक्री करण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला नव्हता. शिष्टमंडळाने तत्कालीन भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेतल्यावर लाभार्थ्यांना त्यांचा हक्क देण्याबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार यांनी भूकंपग्रस्तांचे प्रश्न मांडले होते.

पाठपुराव्यास यश, अडचणी दूर होणार उमरगा व लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्तांना अनेक अडचणी येत होत्या. यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर यासंबंधी आदेश निघाला आहे. -सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

कबाल्याचा प्रश्नही सोडवू दोन्ही तालुक्यातील नव उद्योजक, महिला उद्योजकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. घर खरेदी-विक्री संदर्भात खूप तक्रारी होत्या. त्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय झाला. कब्याल्याचा प्रश्न प्रलंबित असून आगामी काळात तो सुद्धा सोडवू. - सुनील साळुंके, तालुकाध्यक्ष, लोहारा.

बातम्या आणखी आहेत...