आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानवमी:आई राजा उदो उदोच्या जयघोषात नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

तुळजापूरएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

महानवमीदिनी गुरुवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता होमकुंडावरील धार्मिक विधीनंतर घटोत्थापनाने तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. मंदिरातील घटोत्थापनानंतर घराघरातील घट उठवण्यात आले व गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेले नवरात्रीचे उपवास सोडण्यात आले.

गुरुवारी सकाळी तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारतीनंतर पुजारी प्रशांत पाटील यांनी अंगारा काढला. मानाप्रमाणे दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयातील सेवक जीवन वाघमारे यांनी होमकुंडावर धार्मिक विधी पूर्ण केला. त्यानंतर मंदिरातील घट उठवण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदींची उपस्थिती होती. उपविभागीय पोलिस अधिकारी सई पाटील, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद यांनी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

पलंग पालखीचे स्वागत
सायंकाळी ६ च्या सुमारास शुक्रवार पेठ येथील पलंग पारावर नगरचा पलंग व भिंगारच्या पालखीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी स्वागत केले. या वेळी पलंग पालखीचे मानकरी, पलंगे, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरा किसान चौक, साळुंके गल्ली, आर्य चौकमार्गे पलंग पालखीचे वाजतगाजत मंदिरात आगमन झाले. या वेळी जागोजागी पलंग पालखीवर कुंकवाची उधळण करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिर रात्रभर खुले, मध्यरात्री १२ वाजता अभिषेक पूजा
गुरुवारी महानवमीदिनी दुपारी होमकुंडावरील धार्मिक विधीनंतर तुळजाभवानी मंदिरात रात्रभर विविध धार्मिक विधी सुरू असल्याने तुळजाभवानी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले. दररोज सायंकाळी ७ वाजता होणारी तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा गुरुवारी नवमीला मध्यरात्री करण्यात आली. मध्यरात्रीच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळ्याची तयारी करण्यात येऊन तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला दिंड (१०८ साड्यांमध्ये मूर्ती लपेटणे) गुंडाळण्यास प्रारंभ करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...