आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आई राजा उदो उदो’चा गजर:संबळाच्या कडकडाटात अन् कुंकवाच्या मुक्त उधळणीत तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

तुळजापूर / प्रदीप अमृतराव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुजारी-भाविकांसह मानकऱ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह, मातेची श्रमनिद्रा सुरू

संबळाच्या कडकडाटात आणि “आई राजा उदो उदो’च्या गजरात शुक्रवारी (दि.१५) पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला. या वेळी कुंकवासोबतच फुलांची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता श्रमानिद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावली. ५ दिवसांच्या श्रमनिद्रेनंतर बुधवारी (दि. २०) पहाटे आश्विन पौर्णिमेदिनी तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल.

शुक्रवारी पहाटे ५:३० च्या सुमारास तुळजाभवानी मातेची मूर्ती सीमोल्लंघन सोहळ्यासाठी पालखीत ठेवण्यात आली. त्यानंतर “आई राजा उदो उदो’च्या गजरात आणि संबळाच्या कडकडाटात पालखीतून प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा मारण्यात आली. या वेळी प्रदक्षिणा मार्गावर पिंपळाच्या पारावर तुळजाभवानी माता काही काळ विसावली. पारावर देवीला नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या. विसाव्यानंतर पुन्हा प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. या वेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवांसह पुजारी, मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी मध्यरात्री १२ वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला, तर अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला दिंड (१०८ साड्यात मूर्ती लपेटणे) गुंडाळण्यात आले. त्यानंतर धुपारती होऊन गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी करण्यात येऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती सीमोल्लंघन सोहळ्यासाठी पालखीत ठेवण्यात आली. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्या हस्ते पलंग, पालखीचे मानकरी व इतर सेेेवेकऱ्यांचा मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, अर्चनाताई पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, तहसीलदार योगिता कोल्हे, सोलापूरचे सहआयुक्त आशिष लोकरे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, प्रा. धनंजय लोढे, जयसिंग पाटील, राजकुमार भोसले, नागेश शितोळे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

स. ६:३० वाजता मंदिर बंद
सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता नगरच्या नव्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी सिंह गाभाऱ्यात विसावली. त्यानंतर रात्रभर खुले असणारे मंदिर बंद करण्यात आले व पुन्हा लगेच सकाळी ७:३० वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर पुन्हा उघडण्यात आले.

पलंग पालखी वाजतगाजत मंदिरात
सीमोल्लंघन सोहळ्यासाठी नगरचा पलंग व भिंगारच्या पालखीचे सोमवारी रात्री शहरातील बोंबल्या चौक, किसान चौक, साळुंके गल्ली, आर्य चौकमार्गे राजे शहाजी महाद्वारातून वाजतगाजत तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले. तत्पूर्वी मार्गावर सर्वत्र आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, तर जागोजागी पालखीवर कुंकवाची उधळण करून स्वागत करण्यात आले.

पाच दिवसांची श्रमनिद्रा संपवून बुधवारी (दि.२०) आश्विन पौर्णिमेदिनी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल, तर सायंकाळी शिवलाड तेली समाजाच्या काठ्यांसह छबिना मिरवणुकीनंतर महंतांच्या जोगव्यानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.

पलंगावर सर्व धार्मिक विधी
मंचकी निद्रेदरम्यान चरणतीर्थ पूजा, प्रक्षाळपूजा, दोन वेळच्या अभिषेक पूजा, नैवेद्य आदी तुळजाभवानी मातेचे सर्व धार्मिक विधी पलंगावर करण्यात येतात. मंचकी निद्रेच्या कालावधीत तुळजाभवानी मातेला सुवासिक तेलाने अभिषेक घालण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...