आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुळजाभवानी मंदिर पांढऱ्या शुभ्र एलईडीने उजळणार; नवरात्रोत्सवाची तयारी

प्रदीप अमृतराव | तुळजापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महामारी कोविड-१९ चे काळे ढग हटवत यंदा तुळजाभवानी मंदिर यंदा पांढऱ्या शुभ्र एलईडी लाइट्सच्या प्रकाशाने उजळणार आहे. यासाठी अत्याधुनिक ३ चीफ, ४ चीफ एलएडी लाइट्सचा वापर करण्यात येत आहे. पुणे येथील देवीभक्त उंडाळे आणि टोळगे परिवाराच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. उंडाळे व टोळगे परिवाराचे सुशोभीकरणाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे.

तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथील देवी भक्तांच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसापासून १५ कामगार विद्युत रोषणाईचे काम करत आहेत. घटस्थापनेपूर्वी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अनंता आणि कुणाल कावरे हे वर्षभर विद्युत रोषणाईच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाहतात. विद्युत रोषणाईसाठी विनायक यादव, दीपक खोडारीया (मुंबई), गणेश नन्नवरे, रूपेश इधाते पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे संजय टोळगे यांनी सांगितले आहे.

१६ फूट ‘आदिशक्ती’ मुख्य आकर्षण
राजे शहाजी महाद्वाराच्या वरच्या भागात १६ फूट लांबीची भव्य “आदिशक्ती” हे नाव ४ चीफ एलएडीमध्ये मुख्य आकर्षण असणार आहे. तर पाठीमागे शिवाजी दरवाजावर १६ फूट लांबीचे आईसाहेब नाव असणार आहे.

शिखरावर ४०० वॅटचे प्रखर प्रकाशझोत
तुळजाभवानी मातेच्या मंदिर शिखरावर एसएमडी ४०० वॅटचे दोन प्रखर प्रकाशझोत सोडण्यात येणार असून यामुळे अंधाराला दुभंगत तुळजाभवानी मातेचे शिखर पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने उजळणार आहे.

महाद्वारापासून पांढऱ्या रंगाच्या रोषणाईची उधळण
तीर्थक्षेत्र तुळजापुरात राजे शहाजी महाद्वारावर ३ चीफ १.५ व्हॅट एलईडी लाईटचा प्रकाश झोत सोडण्यात येणार आहे. तसेच एक वॅटच्या एसएमडी कलर माळा सोडण्यात येणार आहेत. यासोबतच राजमाता जिजाऊ महाद्वारावर सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या शिवाय गणेश ओवरीत पिक्सलचे तोरण लावण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...