आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 15 जूनपासून तुळजापूर ते आळंदी शेतकरी दिंडी; विनायकराव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

उमरगा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कितीही आंदोलन, वेदनांची महाआरती करुनही निर्ढावलेल्या राज्य सरकारला शेतकऱ्यांविषयी आत्मीयता दिसत नाही. त्यामुळे शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी अन्नपाणी त्याग करुन देहत्यागाची तयारी ठेवत १५ जूनपासून तुळजापूर, पंढरपूर ते आळंदी शेतकरी दिंडी काढणार आहेत.

या संदर्भात पाटील यांनी रविवारी (१२) पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, मागील अनेक महिन्यांपासून अनेकवेळा निवेदन देऊनही शेतकऱ्याच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. राज्यातील शेतकरी खूप अडचणीत आहेत. विजेचा, उसाचा प्रश्न गंभीर झाला होता, खताचे व बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत. पेरणीची वेळ आली तरी राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वाटप करत नाहीत. बियाणे व खते बाजारात मिळत नसल्याने अडचणीत शेतकरी आहे. मागील चार महिन्यात राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. बिल भरूनही वीज तोडली म्हणून पंढरपूर जवळ सूरज जाधव या २५ वर्षीच्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर साखर कारखान्याने ऊस नेला नाही म्हणून बीड जिल्ह्यातील नामदेव जाधव यांनी आत्महत्या केली.

मराठवाड्यात शेतकऱ्यांनी ऊसाच्या फडाला आग लावण्याचे सत्र चालू आहे. शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी शेतकरी नेते विनायकराव पाटील (उमरगा), माणिकराव कदम (परभणी), सिकंदर भाई शहा, अनूप चव्हाण (यवतमाळ), शिवाजी माने, बी. जी पाटील (कोल्हापूर), पंजाबराव पाटील (कराड), राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्यभर फिरून शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती केली. तरी सुध्दा सरकार जागे झाले नाही. शेवटी (कै.) जाधव यांच्या अस्थी मंत्रालयासमोर विसर्जीत करून त्यांचा तेरावा मंत्रालयासमोर घालणार असे जाहीर केल्यानंतर २६ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांकडे चर्चेसाठी बोलावले. ७ जूनला कृषिमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीचर्चेसाठी बोलविले. मात्र बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे पाटील यांनी १५ जूनपासून सुरू करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी दिंडी वाहनातून असेल. अन्न, पाणी त्याग करून उपोषणाने ही दिंडी निघणार आहे. दिंडीचा समारोप १० दिवसांनंतर आळंदीत होईल.

बातम्या आणखी आहेत...