आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुळशी विवाहाची लगबग, आणखी 3 दिवस सोहळा ; झेंडूच्या फुलांनाही चांगली मागणी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी संपताच चाहूल लागलेल्या तुळशी विवाहाला शनिवारपासून (दि.५) मोठ्या उत्साहात आणि थाटा-माटात प्रारंभ झाला. त्यामुळे घरोघरी, मंदिरात आणि सार्वजनीक स्वरुपात जिल्हाभर त्याची लगबग सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी आणखी तीन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे अनेकांची घाई वाढली आहे.

तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी शहरातील विविध चौकात ठिकठिकाणी तसेच रविवारच्या बाजारातही पूजा साहित्याची दुकाने सजली आहे. यासाठी लागणारी ज्वारीची खोपटी, ऊस, बोर, भाजी, आवळा, लाह्या, प्रसाद आदी पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येत आहेत. घराच्या अंगणातील तुळशी वृंदावन सजवण्यात, त्याची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यासाठी लहान-सहान तसेच थोर मंडळीही रममाण झाली आहे. घराघरात तुळशी विवाहाची खास तयारी सुरु झाली आहे. हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाह लावल्यानंतर घरातील लग्नकार्याला सुरुवात होते. त्यामुळे दिवाळीतील शेवटचा सण म्हणून तुळशी विवाहाकडे पाहिले जाते. त्यासाठी प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. विशेष म्हणजे लग्न सोहळा घरोघरी असल्याने सर्वत्रच पुन्हा वाजत असलेल्या फटाक्यांमुळे दिवाळीच साजरी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांकडून दिवे लावून साज-शृंगार करुन लग्न समारंभ उरकण्यात येत आहेत.

पूजा साहित्याची थाळी ४० रुपये
पूजा, विवाहासाठी मंगळसूत्रासह विविध पदार्थ लागतात. विक्रेत्यांनी एकत्रच साहित्य असलेली छोटी थाळी विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली. त्यासाठी ४० रुपये आकारले जात आहेत. यामुळे नागरिकांचा त्रास वाचत असून त्या दुकानाच्या बाजुलाच, फुलं, ऊस आणि अन्य साहित्यही मिळत आहे.

शहरातील विविध भागांत विक्री
तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करण्यासाठी शहरातील नेहरु चौक, देशपांडे स्टँड जवळील भाजी मंडई, जिजाऊ चौक (बार्शी नाका) छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानकासमोरील मुख्य रस्ता, शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणांवर तुळशी विवाहासाठी साहित्य विक्री करण्यात येत आहेत.

झेंडूच्या फुलांचे दर घसरले
तुळशी विवाहात झेंडूच्या फुलांची मागणी असल्याने अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून झेंडूच्या फुलांची दुकाने थाटली आहे. मात्र, यावेळी मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने दसरा-दिवाळीच्या तुलनेत फुलांना दर कमी मिळाला आहे. ४० ते ५० रुपये किलोने या फुलांची विक्री होत आहे.

बातम्या आणखी आहेत...