आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधी रुपयांची उलाढाल:नवरात्रोत्सवात कोट्यवधींची उलाढाल; दुचाकींची विक्री २० टक्क्यांनी वाढली

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकींची गरज अन् क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर खरेदीची प्ररंपरा कायम आहे. त्याप्रमाणे नवरात्रोत्सवात जिल्ह्यातील विविध शोरूममधून दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतीसाठी ट्रॅक्टरची खरेदी-विक्री झाली आहे. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांची खरेदी निश्चित आहे. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चारचाकी, ट्रॅक्टरसह ४४० दुचाकींची बुकिंग झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुचाकीची २० टक्के विक्री वाढली आहे.

महाराष्ट्रात सण-उत्सव मोठ्या थाटाने साजरे केले जातात. त्याप्रमाणे दसऱ्याचा सणही मोठ्या उत्सवात साजरा केला जात असून शुभ मुहूर्तावर जिल्ह्यातील दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टरच्या शोरूम समोर गर्दी दिसत आहे. अनेकांनी नवरात्रोत्सवात खरेदी केली आहे. मात्र, काही जणांकडून मुहूर्तावर खरेदी निश्चित केली असून अॅडव्हान्स रक्कम भरून ठेवली आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर महत्वाचे झाले आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा छोटे ट्रॅक्टर खरेदीचा कल आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पीक पडले नाही.

असे असले तरी दुचाकींची गरज प्रत्येकाला भासत असल्याने विक्री वाढत आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत सर्वच दुचाकींची विक्री २० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. सध्या सोयाबीनसह अनेक खरीप पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही.

दिवाळीपर्यंत बहुतांश पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडून आर्थिक उलाढाला वाढण्याचा अंदाज आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीही केली जाते. दसऱ्यासाठी सर्वच शोरूमची सजावट झाली असून विविध ऑफर दिल्या जात आहेत. ग्राहकांना खरेदीवर आकर्षक गिफ्टही दिले जात आहे. शेतकऱ्यांचे पीक पदरात पडल्यानंतर खरेदी वाढण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

दुचाकींची उलाढाल वाढली
महागाईमुळे दुचाकीच्या किंमती वाढल्या असून कमीत कमी ९० हजार ते २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत दुचाकीच्या किमती झाल्या आहेत. तसेच चारचाकीही ४ लाख ते २० लाखापर्यंत आहेत. यामुळे नवरात्रोत्सवात कोट्यावधीची उलाढाल होत आहे.

कार खरेदीकडे संमिश्र प्रतिसाद
शासनाने ज्यांच्याकडे कार आहे, त्यांचे धान्याच्या रेशन कार्डवरून नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही मध्यमवर्गीय व सामान्य नागरिकांकडून कार खरेदी केल्यास रेशन बंद होईल या भितीने कार खरेदीकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत कारची खरेदी संमिश्र आहे. मात्र, कुटुंबाचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी आगामी काळात कारची विक्री वाढण्याची शक्यता आहे.

दुचाकीला खरेदीला गतवर्षीपेक्षा अधिक प्रतिसाद
नवरात्रोत्सवात व दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदी सर्वाधिक होत आहे. सध्या दुचाकीची गरज वाढल्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत अधिक विक्री होत आहे. शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीन पडल्यानंतर दिवाळीला यापेक्षा अधिक विक्री होण्याची शक्यता आहे. - आकाश तावडे, दुचाकी विक्रेता.

बातम्या आणखी आहेत...