आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:विसर्जन मिरवणुकीत गुलाल ; फुलांसह डीजेतून सव्वा कोटीची उलाढाल

बाळासाहेब माने | उस्मानाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाचे संकटाचे मळभ कमी झाल्याने गणेशभक्तांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. यामुळे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ३ लाख ५० हजार रुपयांच्या २५ टन गुलालाची उधळण अन् ८ लाख रुपयांचे १० टन झेंडू, शेवंती, निशिगंध, गुलाब फुलांचा वापर झाला आहे. तसेच मोदक पेढ्यांतून १२ लाखांची तर डीजेतून जवळपास एक कोटीची उलाढाल झाली आहे.

मिरवणुकीदरम्यान गुलालामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता काही शांतता समितीच्या बैठकांमध्ये फुलांची उधळण करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे अनेक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाचे स्वागत फुलांची उधळण करत केले. स्वागतासाठी जवळपास एक ते दीड क्विंटल फुले उधळण्यात आली. गुलालाने त्वचारोग होतो, कपडे धुण्यासाठी दुप्पट पाणी लागते आणि अंगावरील गुलाल धुण्यासाठीही खूप पाणी लागते. फुले उधळल्याने पण्याची बचत होते. यामुळे काही गणेश मंडळांनी फुलांचा वापर केला. मात्र, दोन वर्षानंतर गणेशोत्सव धूमधडाक्यात होत असल्याने भक्तांचा आनंद गगणाला भिडला होता. यामुळे गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात झाली. जिल्ह्यात गुलालाचे १७ ठोक विक्रेते आहेत. यातील प्रत्येकी जवळपास एक ते दीड टनापेक्षा अधिक गुलालाची विक्री झाली आहे. सध्या गुलाल १५ रुपये किलोने मिळत आहे.

त्यानुसार २५ टन गुलालासाठी ३ लाख ७५ हजार रुपयांची उलाढाल झाली. गुलालाच्या विक्रीचे हे प्रमाण गत दोन वर्षापूर्वीपेक्षा अधिक असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. काही व्यापाऱ्यांनी दोन वर्षानंतर यंदा सर्वाधिक गुलालाची विक्री झाल्याचे सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काही गणेश मंडळांनी फुलांचाही वापर केला. यामुळे गणेशोत्सवात जिल्ह्यात १० टनापेक्षा अधिक फुलांची विक्री झाली असून झेंडू प्रति किलाे ६० ते ८० रुपये हाेता. तसेच ३० ते ५०० रुपयांपर्यंत गणरायाचे हार होते.

डीजेचे दरही वाढले
यंदा जिल्ह्यात ८०० गणेश मंडळांनी परवानगी घेतली होती. त्यापैकी जवळपास ४०० मंडळांनी डीजे लावला. यंदा गत दोन वर्षांपेक्षा डीजेचे दर वाढले आहेत. डीजे बॉक्सनुसार १० ते ५० हजार रुपयांपर्यंत डीजेची सुपारी होती. यामुळे जवळपास एक कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. दोन वर्षापूर्वी ५ ते ३० हजारापर्यंत सुपारी होती, असे एका डीजेवाल्याने सांगितले.

मोदक, पेढ्यातून मोठी उलाढाल
यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात झाला. सर्वच वस्तूंची रेलचेल होती. यामध्ये मोदक व पेढ्यांची सर्वाधिक विक्री झाली. उस्मानाबाद तालुक्यात ६० पेक्षा अधिक स्विट होम आहेत. सर्व दुकानात सरासरी ५० किलो मोदक-पेढ्यानुसार ३ हजार किलोची विक्री झाली आहे. मोदक-पेढा ४०० रुपये किलो आहे. त्यामळे यातून सुमारे १२ लाख रुपयांची उलाढाल झाली.

झेंडूच्या हारांना अधिक मागणी
गणेशोत्सवात दीड टनाहून अधिक झेंडू, ३ क्विंटल शेवंती, ३ क्विंटल निशिगंध, ४ क्विंटल गुलाबाची विक्री झाली. गणरायाचे मोठे हार व काही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत झेंडूचा वापर केल्याने विक्री झाली. गत दोन वर्षाच्या तुलनेत दुप्पट विक्री झाली.
रियाझ शेख, फुल विक्रेते, उस्मानाबाद.

पर्यावरणासाठी फुलांचे महत्त्व
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वर्षानुवर्षे गुलालाची विक्री कमी होत आहे. मात्र, गत दोन वर्षांच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी पर्यावरणाच्या दृष्टीने गणेश मंडळांनी गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्याची गरज आहे.
सागर कारंडे, ठोक विक्रेते.

बातम्या आणखी आहेत...