आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात जुलैनंतर ऑगस्टमध्येही पावसाची संततधार सुरू असून गुरुवारी (दि.४) उस्मानाबाद, तेर, उमरगा तालुक्यासह अनेक भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे उमरगा तालुक्यातील तुरोरी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून बेनीतुरा मध्यम प्रकल्पात ९६ टक्क्यांवर तर जकापूर प्रकल्पात ६५ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे.
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुवारी पावसाने हजेरी लावली. उमरगा तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पासह ३१ लघु व साठवण तलाव आहेत. जून, जुलै, ऑगस्टमध्ये सरासरी ४८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने तीन मध्यम प्रकल्पापैकी तुरोरी प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
बेनीतुरा मध्यम प्रकल्पात ९६ टक्क्यांच्यावर उपयुक्त पाणीसाठा झाला तर जकापूर प्रकल्पात ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील ३१ लघु व साठवण तलावांपैकी कोळसूर, भिकारसांगवी, दगडधानोरा, वागदरी, मुरळी, अचलेर, कोरेगाव हे सात तलाव शंभर टक्के भरले असून इतर सात तलाव ७५ टक्क्यांच्यावर पाणी उपलब्ध झाला आहे. ५० टक्क्यांवर आठ, २५ टक्क्यांवर सात असून सुपतगाव व कोराळ साठवण तलाव अद्याप कोरडे आहेत. पावसाळा अद्याप दोन महिने असून येणाऱ्या महिन्यात व परतीचा दमदार पाऊस झाल्यास तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक साठवण तलाव ओव्हर फ्लो
झाल्याने तलावासह नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. यंदाही ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाने तालुक्यातील सरासरी ४८५ मिली इतका पाऊस झाला असून ऑगस्ट महिन्यात तीन दिवसात उमरगा मंडळ विभागात ६३.३०, दाळिंब विभागात २९.३०, नारंगवाडी २८.५०, मुळज ३९.१०, मुरुम मंडळ विभागात ३१.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी ४८५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.